आव्हाळवाडी-मांजरी परिसरात बिबट्याचा वावर

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ;वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
वाघोली : (ता. हवेली) आव्हाळवाडी-मांजरी शिवेवर असणाऱ्या मानकाई नगर परिसरामध्ये रस्त्याच्या जवळ बसलेला एक बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला असून बिबट्याच्या स्पष्ट व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असल्याने दोन्ही गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाच्या वतीने परिसरात पाहणी करण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोलवडी, मांजरी, आव्हाळवाडी परिसरामध्ये अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. अनेकवेळा बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास आव्हाळवाडी-मांजरी शिवेवरील मानकाई नगर परिसरातील आव्हाळवाडी येथील शेतकरी शिवराम निवृत्‍ती तांबे यांच्या पेरूच्या बागेमध्ये रात्री साडे अकराच्या सुमारास तरुण चारचाकीने जात असताना बिबट्या बसलेला दिसला. बिबट्याच्या दिशेने गाडीची लाईट गेली असता तो शेताच्या दिशेने पसार झाला. सदरचा प्रकार तरुणांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. दरम्यान तरुणांनी सदस्य शरद आव्हाळे व पंचायत समिती सदस्य नारायण आव्हाळे यांना फोनद्वारे संपर्क करून माहिती दिली. ग्रा. पं. सदस्य शरद आव्हाळे, पं. स. सदस्य नारायण आव्हाळे, भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बापू कुटे, माजी उपसरपंच सोपानराव आव्हाळे, पोलीस पाटील उमेश आव्हाळे, भाऊसाहेब तांबे, सुभाष आव्हाळे तंटामुक्तीचे संदीप आव्हाळे, माणिकराव आव्हाळे, पत्रकार सोमनाथ आव्हाळे यांनी सकाळी वन अधिकारी बी. एस. वायकर परिसराची पाहणी केली. येथून जवळ असणाऱ्या शेतात व परिसरामध्ये बिबट्याचे ठसे देखील मिळाले आहे. बिबट्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. याबाबत वनविभागानी परिसराची पाहणी केली असून नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

“व्हिडीओमध्ये कैद झालेला बिबट्या मादी आहे. पोटाचा वाढलेला आकार पाहता तिच्या पोटामध्ये पिल्ले असण्याची शक्यता आहे. या परिसरामध्ये वावरताना नागरिकांनी काळजी घ्यावी.”
-बी. एस. वायकर, वनरक्षक

“पोटाचा आकार पाहता मादी गर्भवती असल्याचे दिसून येते. पिल्लांना जन्म दिल्यांनतर मादी अधिकच आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. पिंजरा लावण्यासाठी वनविभागाकडे मागणी केली आहे.”

-गणेश बापू कुटे (भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष)