प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

चौकशीत बिबट्याचा व्यवहार सासवड येथे होणार असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीसांनी सासवड येथे सापळा रचून इतर आरोपींना आज अटक केली आहे.

    पुणे : बिबट्याच्या कातडीचे तस्करी प्रकरण पुणे वनविभागाने उघडकीस आणले असून, यामध्ये ८ जणांना अटक केली आहे. कातडी तस्करीने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. वारजेतील डुक्करखिंड परिसरात वनविभागाने त्यांना पकडले आहे.

    अनिकेत प्रमोद भोईटे (वय २०), संदिप शंकर लकडे (वय ३४, रा. फलटण), धनाजी नारायण काळे (वय ३५, रा. औरंगाबाद), आदेश शरदराव इंगोले (वय ४७, रा. बारामती), बाळू बापू नामदा (वय ६५, रा. कराड), आकाश आण्णासाहेब रायते (वय २७, रा. इंदापूर), उदयसिंह शंकरराव सावंत (वय ४७), अमोल रमेश वेदपाठक (वय ३४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

    भांबुर्डा वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना बिबट्याच्या कातडीची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानुसार, तिघेजण वारजेत येणार असल्याचे समजल्यानंतर वनविभागाने बनावट ग्राहक म्हणून त्यांच्याशी संपर्क केला. त्यांना संपर्क साधल्यानंतर त्यांनी वारजे परिसरात बोलावले. त्याचदरम्यान, वनविभागाने याभागात सापळा रचला. आरोपींनी दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणांचे पत्ते दिले. त्यानंतर त्यांना डुक्करखिंड परिसरात बोलविण्यात आले. तेथे गेल्यानंतर त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीत बिबट्याचे कातडे दिसून आले. लागलीच पथकाने छापा टाकत अनिकेत, संदिप व धनाजी या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

    सासवड येथे होणार होता व्यवहार

    चौकशीत बिबट्याचा व्यवहार सासवड येथे होणार असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीसांनी सासवड येथे सापळा रचून इतर आरोपींना आज अटक केली आहे. आता त्यांच्याकडे बिबट्याची शिकार कोणी व कोठे केली. तसेच, इतर कोणी आरोपी आहेत का, तर त्याच्या व्यवहाराबाबत चौकशी सुरू आहे. पुण्यात बिबट्याच्या कातडीची तस्करी उघडकीस झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.