इंदापूरच्या पडस्थळमध्ये आढळला बिबट्या; ग्रामस्थांमध्ये भीती

  इंदापूर : पडस्थळ (ता.इंदापूर) गावच्या हद्दीतील झेंडेवस्तीच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पडस्थळ ग्रामपंचायतीने पत्राद्वारे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडे पिंजरा बसवण्याची मागणी केली आहे. पत्राद्वारे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी तशी परवानगी देण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे. त्या भागातील गस्त वाढवली आहे. बिबट व मानवात संघर्ष होवू नये, यासाठी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती ग्रामस्थांना दिली आहे.

  इंदापूर शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर उजनी पाणलोट क्षेत्रात पडस्थळ हे गाव आहे. त्याच्या हद्दीत पूर्वेस अडीच किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठावर असणाऱ्या झेंडेवस्तीवर ७ जूनला आठच्या सुमारास पोलीस कर्मचारी प्रकाश झेंडे, त्यांची पत्नी व घिसडे नावाच्या मासेमारास झेंडे यांच्या घरामागे बिबट्या दिसला. त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे झेंडेवस्तीवर राहणारे नितिन झेंडे, समीर झेंडे, हेमंत झेंडे, बंकट झेंडे हे त्या ठिकाणी आले. घटनेचे गांभीर्य ओळखून नितीन झेंडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना भ्रमणध्वनीवरुन सर्व माहिती दिली. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

  ८ जून रोजी पडस्थळच्या सरपंच लता भिसे यांनी पत्राद्वारे वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे झेंडेवस्तीवर पिंजरा लावण्याची मागणी केली. दरम्यानच्या काळात वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन त्या ठिकाणी आढळलेल्या वन्य प्राण्याच्या पायाच्या ठशांची छायाचित्रे काढून तपासणीसाठी वरिष्ठांकडे पाठवली. ते ठसे बिबट्याचे असल्याचे निष्पन्न झाले. तसेच १० जून रोजी सायंकाळी सहा ते सव्वासहा वाजण्याच्या दुभती जनावरे घरी घेऊन जात असलेल्या सुनीता तानाजी झेंडे या महिलेस व तिची मुलगी पूनम झेंडे व दोन मासेमारांना बिबट्या दिसला. त्याचदिवशी गवत काढायला गेलेल्या छाया कमलाकर झेंडे या महिलेच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न बिबट्याने केला. या प्रकाराने हवालदिल झालेल्या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधून बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी केली.

  त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी झेंडेवस्तीस भेट दिली. मानव व बिबट यांच्यात संघर्ष होवू नये याकरिता प्रतिबंधक उपाय म्हणून बाहेर पडताना घुंगराची काठी बाळगावी. सोबत कुणाला तरी घेऊन जावे. ये-जा करताना मोबाईलची गाणी चालू करुन ठेवावीत. यदाकदाचित बिबट्या आढळल्यास फटाके फोडावेत. अंगणात उघड्यावर झोपू नका. बालकांना एकटे घराबाहेर सोडू नका. पशुधन कुंपणात बंदिस्त ठेवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

  तो तरस असावा

  दै.’नवराष्ट्र’शी बोलताना वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे म्हणाले की, बिबट्याला ज्या महिलांनी पाहिले त्यांना वन्यप्राण्याची छायाचित्रे दाखवली त्यावेळी त्यांनी त्या प्राण्याच्या शरीरावर पट्टे असल्याचे सांगितले. त्यावरुन ते तरस असावे असा कयास काढता येतो. मात्र, पंजाचे ठसे पाहता ते बिबट्याचे आहेत, असे दिसून येत आहे. वन विभागाच्या कर्मचा-यांना त्या भागात अद्याप कोणता ही वन्यप्राणी आढळलेला नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून तेथील गस्त वाढवण्यात आली आहे. वरिष्ठांकडे पिंजरा लावण्यासाठी परवानगी मागितली आहे.

  भीमा नदीच्या किना-यावर वसलेल्या झेंडेवस्तीवर पंचवीस कुटुंबे राहतात. सव्वाशेच्या आसपास लोकसंख्या आहे. शेळ्या मेंढ्या गायी म्हशी असे मोठे पशुधन आहे.गोठे नाहीत. घरासमोर मोकळ्या जागेत ही जनावरे बांधली जातात. मच्छीमारीसाठी आलेली पन्नास कुटुंबे नदीकाठी बांधलेल्या पालांमध्ये रहिवास करतात.या परिसरात प्रामुख्याने ऊस शेती केली जाते. वनपरिक्षेत्रात दाट झाडी आहे.बिबट्यासारख्या प्राण्यास दडून बसण्यासाठी मुबलक जागा आहे. या भागात गुरुवार,शुक्रवार व शनिवारी या दिवशी रात्री एक वाजता वीज उपलब्ध होते. शेतीला पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जावे लागते.

  विद्युत मोटारींचा घोटाळा झाल्यास नदीवर ही जावे लागते. लोकांना व पाळीव जनावरांना धोका होण्याची शक्यता आहे. या भितीने लोक धास्तावले आहेत. त्यामुळे बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितिन झेंडे यांनी केली आहे.

  दरम्यान, बाजार समितीचे माजी उपसभापती पांडुरंग मारकड, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे सदस्य महेंद्र रेडके पोलीस पाटील गणेश राऊत यांनी गावातील तरुणांच्या साथीने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयास आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी ठेवली आहे.