गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत मार्च, एप्रिलमध्ये मृत्यू कमी

महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांची माहिती पुणे : शहरामध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ही २५० च्या वर गेली असली तरी शहरातील सरासरी मृत्यू दरामध्ये फारसा फरक पडलेला नाही.

महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांची माहिती

पुणे :
शहरामध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ही २५० च्या वर गेली असली तरी शहरातील सरासरी मृत्यू दरामध्ये फारसा फरक पडलेला नाही. फारतर कोरोनाची साथ आल्यानंतर मागील तीन महिन्यांत अगोदरच्या दोन वर्षांच्या तुलनेत मृत्यू दर काहीसा घसरलेला पाहायला मिळत आहे.     कोरोनामुळे मरण पावलेल्यांचा आकडा रोजच वाढू लागल्याचा अनेकांनी धसका घेतला आहे. अर्थातच संसर्गजन्य आजाराच्या सजगतेतून काळजी युक्त भिती निर्माण झालेली आहे.  हे मागील तीन वर्षातील मृतांच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. मागील तीन वर्षातील फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांतील मृतांची आकडेवारी पाहील्यानंतर ही बाब प्रकर्षाने पुढे आली आहे.  पुणे शहरात फेब्रुवारी २०१८ मध्ये २६०५, मार्चमध्ये २६०८ आणि एप्रिलमध्ये २४३८ मृत्यूंची नोंद झाली होती. फेब्रुवारी २०१९ मध्ये २०२७, मार्चमध्ये  २४७६ आणि एप्रिलमध्ये २३४० मृत्यू नोंदविले गेले. तर यावर्षी अर्थातच २०२० मध्ये फेब्रुवारीमध्ये  २१४७, मार्चमध्ये २२७३ आणि एप्रिलमध्ये २३३५ मृत्यूंची नोंद झाली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली आहे. दरम्यान, शहरातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या ८९ टक्के रुग्णांना मधुमेह, न्यूमोनिया, ह्दयरोग व अन्य आजार होते. अगोदरच प्रतिकार शक्ती कमी झाल्याने कोरोनाच्या संसर्गाला ते बळी पडल्याचे विभागीय आयुक्त डॉ. उदय म्हैसेकर यांनी सांगितले.

   

      वरिल आकडेवारीवरून साधारण फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल अशी तीनही वर्षांची तुलना केल्यास २०१८ मध्ये या तीन महिन्यांत ७६५१ जण मरण पावले होते. २०१९ मध्ये ६८९३ जण मरण पावले होते तर २०२० मध्ये ६७५५ जण मरण पावले आहेत.  मार्च महिन्यांत राज्य शासनाने दुसर्‍या आठवड्यात केलेली संचारबंदी आणि २४ मार्च रोजी देशपातळीवर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सेवां व्यतिरिक्त सर्वच प्रकारची वाहतूक ठप्प झाली. सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे रस्त्यांवरील अथवा कामाच्या ठिकाणच्या अपघातांचे प्रमाण नगण्य राहीले. त्यामुळे मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत अपघाती मृतांचा आकडा कमी झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, इतर व्याधी आणि आजारांमुळे मरण पावलेल्यांच्या संख्येत मात्र फारसा फरक पडलेला नसल्याचे दिसून येत आहे.

   

       यासंदर्भात वैद्यकीक तज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले कि पुण्यासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात कॅन्सर, न्यूमोनिया, हार्टऍटॅक, मधुमेह, वृद्धापकाळाने  व अन्य आजारांनी मृत्यू ओढवण्याचे प्रमाण कायमच राहाणार आहे. कोरोनामुळे मृत्यूदरामध्ये काहीही फरक पडला नाही. जगराहाटी चालूच राहाते. प्रदुषणामुळे कोणी मरत नाही. परंतू लॉकडाउन झाल्याने घरात बसून असल्याने नागरिक प्रकृतीबद्दल अधिक सजग झालेत. वेळच्यावेळी औषधे, आहार घेत आहेत. त्याचवेळी लॉकडाउनमुळे वाहतुक ठप्प झाल्याने अपघात कमी झालेत, हे नक्की.

      आपल्याकडे जानेवारीमध्ये केरळमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. केरळ सरकारने वुहानमध्ये कोरोनाची लागण ाल्यानंतर परदेशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली आणि त्यांना क्वारंटाईन केल्याने ते साथीवर मात करू शकले. आपल्याकडे पहिल्या टप्प्यात चीन आणि कोरीयातून येणार्‍या विमानांना बंदी घालण्यात आली. नंतर अन्य सात देशातील विमानांना बंदी घालण्यात आली. महाराष्ट्रामध्ये विमानतळावर प्रवाशांची जुजबी तपासणी करण्यात आली आणि होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला. याच प्रवाशांकडून महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा सर्वाधीक प्रसार झाल्याचेही डॉ. भोंडवे यांनी नमूद केले.वर्ष               फेब्रुवारी         मार्च         एप्रिल

२०१८            २६०५         २६०८      २४३८

२०१९            २०७७         २४७६      २३४०

२०२०            २१४७         २२७३      २३३५