लॉकडाऊनचा जिल्ह्यातील फुलशेतीला फटका

शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण : चक्रीवादळाने पॉलीहाऊस झाली उध्वस्त
रांजणी : लॉकडाऊनच्या काळात गेल्या सहा महिन्यात पुणे जिल्ह्यात फुल शेतीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले गेले. मात्र काेराेना महामारी व निसर्ग चक्री वादळामुळे जिल्ह्यात फुल शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता येऊन अडीच तीन महिन्याचा कालखंड उलटला तरी अद्याप फुलांना अद्याप मागणी नाही. दरही अत्यंत कमी प्रमाणात मिळत आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर, तो फुल उत्पादक शेतकरी आहे. जिल्ह्यात फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते अर्थात फुलशेतीचे नियोजन शेतकरी सण समारंभ उत्सव यानुसार करत असतो मात्र मागच्या व्हॅलेंटाईन डे नंतर सुरू झालेली फुल उत्पादकांची दूरदशा अद्यापही संपायचे नाव घेत नाही. झेंडू शेवंती गुलछडी यांची उघड्यावर लागवड करणारे शेतकरी असो की गुलाब जरबेरा कारनेशन यांचे पॉलीहाउस मध्ये उत्पादन घेणारे शेतकरी असू हे सर्व सध्या प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत एप्रिल ते जून २०२० या तीन महिने लॉकडाऊनच्या काळात फुलांचा बाजार पूर्णपणे बंद होता. निर्यातही ठप्प होती. खरे तर हा लग्न सराईचा हंगाम म्हणजे फुल उत्पादकांसाठी चार पैसे मिळविण्याचा हंगाम होता परंतु अशा काळात उघड्यावरील तसेच पॉलिहाऊसमधील फुले तोडून फेकून देण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नव्हता. लॉकडाऊन नंतर हळूहळू फुलांचे मार्केट स्थिरस्थावर होईल, अशी आशा फुल उत्पादकांना होती. कारण पुढे जून ते ऑक्टोबर नोव्हेंबर हा श्रावण गणेशोत्सव नवरात्र दसरा दिवाळी असा समारंभाचा काळ असतो. परंतु या काळातही सण-समारंभ साध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत.

धार्मिक स्थळ अजूनही बंदच आहेत. फुलांना मागणी नाही दरही अत्यंत कमी आहेत. त्यामुळे पॉली हाऊसमधील गुलाबांचे करायचे तरी काय? असा सवाल जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला पडला आहे. दुष्काळात तेरावा महिना या उक्तीप्रमाणे दरम्यानच्या काळात निसर्ग चक्रीवादळाने अनेक शेतकऱ्यांचे पॉलीहाऊसेस उध्वस्त करून टाकले त्यातूनही अनेक शेतकऱ्यांनी दसरा दिवाळीसाठी उघड्यावर, पॉलिहाऊसमध्ये विविध फुलांची लागवड केली आहे. शेतीच्या बाबतीत क्लस्टर विकासाचे केंद्र सरकारचे धोरण आहे. राज्य सरकारनेही याच धरतीवर शेतीला प्रोत्साहन द्यायचे ठरवले आहे. क्लस्टर निहाय शेती विकासाची संकल्पना फुल शेती मध्ये सुद्धा राबविणे गरजेचे आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात पॉलिहाऊसमधील फुलशेती अधिक आहे. शिवाय उघड्यावरील फुलशेतीला भागातील वातावरण पोषक असेच आहे. राज्यभरातील असे क्लस्टर शोधून त्यांना उत्पादन ते विक्रीसाठीच्या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून द्यायला हव्यात.

पॉलिहाऊसमधील फुलशेतीचे भवितव्य निर्यातीवर अवलंबून आहे. अशा वेळी कट फ्लॉवरच्या निर्यातीमधील अडचणी दूर करून ही फुले अधिकाधिक बाहेर कशी जातील हे पाहणे देखील गरजेचे असताना केंद्र सरकारने त्याची आयात करण्याचा निर्णय जुलै २०२० मध्ये घेतला हा त्यांचा निर्णय म्हणजे आधीच अडचणीत असलेल्या फुल उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार अाहे.

-प्रवीण थोरात, प्रगतशील शेतकरी, चांडोली बुद्रुक

 नुकसानीच्या प्रमाणात हवी भरपाई
फूल उत्पादक तुलनेने कमी आहेत. शिवाय ते प्रचंड असंघटित आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून ते मागणी करतात. परंतु त्याची दखल शासन आणि प्रशासनाकडून घेतली जात नाही. नुकसानग्रस्त पॉलिहाऊस, शेतीची पाहणी पंचनामे झाले काही भागात मंत्र्यांचे दौरे झाले. मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली, परंतु फूल उत्पादक अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पाहायला मिळते नैसर्गिक आपत्तीत फुलशेतीच्या झालेल्या नुकसानीच्या प्रमाणातभरपाई मिळायला हवी.