लॉकडाऊन, पावसामुळे मेंढपाळांचे हाल

वाहनसाधन नसल्याने अत्यावश्‍यक सेवाही नाही सासवड : सद्यःस्थितीला भाटघर परिसरात दोन दिवसांमध्ये एकदा तरी पाऊस पडत असल्याने शेतामध्ये मुक्‍काम ठोकलेल्या मेंढपाळांच्या कुटुंबाचे हाल होत आहेत.


वाहनसाधन नसल्याने अत्यावश्‍यक सेवाही नाही
सासवड :
सद्यःस्थितीला भाटघर परिसरात दोन दिवसांमध्ये एकदा तरी पाऊस पडत असल्याने शेतामध्ये मुक्‍काम ठोकलेल्या मेंढपाळांच्या कुटुंबाचे हाल होत आहेत. पाऊस पडल्याने शेतामध्ये पाणी साचल्यास मेंढपाळाच्या कुटुंबीयांना रात्र कशीबशी काढावी लागत आहे.
बारामती तालुका बागायत पिकांनी बहरलेला आहे. तालुक्‍यात डोंगर भागाचा अभाव असल्याने शेळ्या मेंढ्यांसाठी चाऱ्याचा तुटवडा भासत आहे. यामुळे येथील मेंढपाळ भोर-महाड परिसराकडे धाव घेतात. दिवाळीनंतर सात ते आठ दिवसांनी मेंढपाळ शेळ्या, मेंढ्या, कुटुंबासह स्थलांतरित होतात. भोर परिसर डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आहे, तसेच येथे पावसाचे प्रमाण भरपूर असल्याने याठिकाणी मुबलक चारा उपलब्ध असतो.
मेंढपाळ या ठिकाणी सात ते आठ महिने वास्तव्य करतो. मेंढ्यांनी शेतात मुक्काम केल्यास या जनावरांच्या लेंड्यांपासून शेताला पोषक खत मिळते, या बदल्यात शेतकरी मेंढपाळांना ठराविक रक्‍कम देतो. मात्र, सध्याच्या स्थितीत मेंढपाळांचे खूप हाल होत आहेत.
-भाजीपाला-औषधोपचारही वेळेवर नाहीत
भोर शहरात करोनाचे दोन पेशंट पॉझिटिव्ह सापडल्याने नुकतीच सुरू झालेली एसटी व्यवस्था बंद करण्यात आली आहे. तसेच लॉकडाउनमधील पहिल्या टप्प्यापासूनच वडापही बंद आहे, यामुळे मेंढपाळांना भाजीपाला आणावयाचा असल्यास किंवा औषधोपचारासारख्या अत्यावश्‍यक सेवांसाठी भोर शहराकडे जायचे असल्यास वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.