लिफ्ट देण्याचे बहाण्याने लुटमार करणारी टोळी जेरबंद ; २ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस

-एलसीबी पुणे ग्रामीण पथकाची कामागिरी

दौंड : कुरकुंभ( ता.दौंड ) परिसरात प्रवाशांना लिप्ट देण्याचा बहाणा करून निर्जन स्थळी नेवून लुटमार करणाऱ्या टोळीतील चौघांना जेरबंद करून दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
दिनांक ५ डिसेंबर २०२० रोजी रात्री ९.३० च्या सुमारास फिर्यादी संजय मिश्रीलाल मुनोत (वय ५४) हे बार्शी येथून एसटीने कुरकुंभला उतरून दौंड येथे घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत थांबले असताना ,त्यांना एका मोटरसायकल वरील अनोळखी इसमाने दौंड येथे जाण्यासाठी लिफ्ट देतो, असे सांगुन त्याच्या मोटरसायकल वर मागे बसवून भागवतवस्ती कॅनलपासुन कॅनलचे भरावावरुन फायर बटाकडे निर्जन स्थळी नेवुन तेथे मोटारसायकलवर थांबलेले त्याचे दोन जोडीदार यांचेजवळ नेवुन तिघांनी मिळून फिर्यादीस दमदाटी करून, ”सर्व काढुन दे, नाही तर भोकसुन टाकीन” अशी धमकी दिली. त्याचे खिशातील रोख रक्कम रुपये १०,००० रुपये तसेच दोन अंगठ्या, गळ्यातील सोन्याची चैन, घड्याळ व मोबाईल असा किंमत रुपये १,९४,००० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून नेला होता. या बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दौंड पो.स्टे. ला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक कुरकुंभ परिसरात तपास करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ओमकार गावडे (रा.बेटवाडी )व त्याचे साथीदार हे चोरीचे मोबाईल व अंगठ्या विकणेसाठी कुरकुंभ एसटी स्टँड समोर आलेले आहेत. त्यानुसार एलसीबी पथकाने त्या ठिकाणी जावून सापळा रचून तेथे संशयास्पद रित्या मिळून आलेले ओमकार उर्फ काका महेंद्र गावडे (वय २१ वर्षे रा.बेटवाडी, होलेमळा ता.दौंड ),राजेश संभाजी बिबे (वय १९ वर्षे रा.गिरीम ता.दौंड, मूळ रा.माळेवाडी ता.जि.बिड),अजय ज्ञानेश्वर पवार (वय १९ वर्षे रा.लोणीकाळभोर, एचपी गेटसमोर ता.हवेली, मूळ रा.गिरीम ता.दौंड) , विशाल दिलीप आटोळे (वय २४ वर्षे रा.गोपाळवाडी , गोकुळनगर ता.दौंड जि.पुणे) यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून १ पल्सर मोटरसायकल, २ सोन्याच्या अंगठ्या, ८ मोबाईल व रोख रक्कम असा किं.रु. २,२६,२७०चा माल हस्तगत केला. त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता आरोपी ओमकार गावडे, राजेश बिबे, अजय पवार या तिघांनी मिळून प्लान करुन प्रवाशाला लिफ्ट देण्याचा बहाणा करून लुटल्याचे व त्यांचेकडे मिळालेल्या दोन अंगठया त्याच चोरीतील व पल्सर मोटरसायकल गुन्हा करताना वापरल्याचे सांगितले आहे. गुन्हयातील चोरलेला मोबाईल हा आरोपी विशाल आटोळे यास १०,००० रुपयाला विकल्याचे सांगितले. तो मोबाइलही त्याचेकडून हस्तगत केलेला आहे.

सदर आरोपी क्र.१ ते ३ यांचेकडे आणखीन चौकशी करता त्यांनी सुमारे २० दिवसापूर्वी पहाटे ४. वा.चे सुमारास कुरकुंभ एमआयडीसी पुणे-सोलापूर हायवे लगतचे शिवरत्न लॉजचे समोर लावलेल्या आयशर टेम्पोची काच फोडून टेम्पोत झोपलेल्या ड्रायव्हरचे डोक्यात काठीने मारुन त्यास कोयत्याचा धाक दाखवून टेम्पोचे डॅशबोड मधील २८०० रुपये जबरीने चोरल्याचे सांगितले. सदर बाबत दौंड पो.स्टे. जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.

सदर आरोपींकडून दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील २ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आरोपींनी कुरकुंभ एमआयडीसी येथे बाहेर गावाहून कामानिमित्त येणाऱ्या बऱ्याच लोकांची लुटमार केल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तपास चालू असून आरोपींकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दौंड, कुरकुंभ, पाटस परिसरात लिफ्ट देऊन आणखीन कोणाला जबरदस्तीने लूटमार झाली असल्यास दौंड पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी केले असून जप्त मुद्देमाल व आरोपी पुढील कारवाईसाठी दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला आहे. पुढील अधिक तपास दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा.पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती अपर पोलिस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय अधिकारी श्री.राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, दगडू विरकर यांनी केलेली आहे.