बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी महेश रोकडे

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी महेश रोकडे (Mahesh Rokade) यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बारामती नगरपरिषदेला मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. आता बारामती नगरपालिकेला मुख्याधिकारी मिळाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवून स्वागत केले. यावेळी मोदकाचे देखील वाटप केले.

    आज स्विकारला मुख्याधिकारीपदाचा पदभार

    बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांची बदली झाल्याने गेले अनेक दिवस हे पद रिक्त होते. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे मुख्याधिकारी पदाचा चार्ज होता. मात्र, नागरिकांसह नगरपालिकेची अनेक कामे रखडली होती. यासंदर्भात बारामती नगरपरिषदेला मुख्याधिकारी मिळावा, यासाठी मनसेच्या वतीने गेली पंधरा दिवसांपूर्वी नगरपरिषदेसमोर आंदोलन केले होते. आज नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे महेश रोकडे यांनी स्विकारली.

    यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, पोलिस निरीक्षक नामदेवराव शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादीचे गटनेते सचिन सातव यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्याधिकारी पदाचा पदभार हाती स्विकारल्यानंतर रोकडे यांनी बारामती नगर परिषदेच्या सर्व खाते प्रमुखांची आढावा बैठक घेऊन कामास सुरुवात केली.

    महेश रोकडे यांनी यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छ सर्वेक्षण व वसुंधरा अभियानात प्रभावीपणे काम केले आहे. या दरम्यान शिरुर, इंदापूर, विटा याठिकाणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी काम पाहिले आहे.