मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

रांजणगाव गणपती: येथील युवा शेतकरी गणेश भगवंत लांडे यांच्या शेतातील कांद्याचे पीक मुसळधार पावसामुळे पूर्णपणे नष्ट झाले असून त्यामुळे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे लांडे यांनी सांगितले. या बाबत लांडे यांनी सांगितले की, मागच्या आठवड्यात ३० हजार रुपये किंमतीचे रोप विकत आणून अडीच एकर क्षेत्रात कांदा पिकाची लागवड केली. लागवडीपूर्वी २३ हजार रुपयांचे कोंबड खत या शेतात टाकण्यात आले होते. अडीच एकर कांदा लागवडीसाठी १४ हजार रुपये मजुरी खर्च आला तर नांगरणी,कुळवणी व जमिनीची पूर्व मशागत आणि लागवड मशागत करण्यास ८ हजार व वरखते १८ हजारो रुपये असा एकूण सुमारे लाख रुपये खर्च कांदा लागवडीसाठी आला होता.

-शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी
लागवड केल्यानंतर दोनच दिवसांनी जोराचा वादळवाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नुकतीच लागवड केलेल्या कांद्याचे रोपे जागेवरच मोडून पडली त्यामळे सर्व कांदा लागवडीचा खर्च वाया गेला असून, यामध्ये लांडे यांचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाने दुबार लागवडीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. कांद्याचे उत्पन्न तर सोडाच पण लागवड केलेल्या कांद्याचे पीक पूर्णपणे नष्ट झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कृषी विभागाने पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी लांडे यांनी केली आहे.