आंबेगाव तालुक्यात पोलिसांची मोठी कारवाई; दारू तयार करणारी ठिकाणं उद्धवस्त

पाचशे लिटर कच्चे रसायन, दारू बनविण्यासाठी वापरात येणारा नवसागर, गुळ जप्त करून नष्ट करण्यात आला.

    पुणे / वैभव मंडलिक : आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दारू तयार करणारे तसेच विक्री करणाऱ्यांवर घोडेगाव पोलिस स्टेशनमार्फत धडक कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर पहिल्यांदाच कच्चा माल पुरवणाऱ्या व्यापारी व दुकानदारांवरही कारवाई करण्यात आली आहे.

    आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात रविवारी (दि. २९) छापा टाकून अवैध दारू धंद्यावर घोडेगाव पोलिसांनी धडक कारवाई करत, ज्या ठिकाणी  दारू पाडली जाते, असे पाचही ठिकाणं नष्ट करण्यात आली आहे. यावेळी पाचशे लिटर कच्चे रसायन, दारू बनविण्यासाठी वापरात येणारा नवसागर, गुळ जप्त करून नष्ट करण्यात आला. यावेळी पोलिसांनी फक्त दारू पाडणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर नवसागर व गुळ विक्री करणाऱ्या दुकानदारांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    स्वत: घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दारू पाडणा-यांवर कडक कारवाईचा बडगा उचलला आहे. डिंभे ते माळीणफाटा दरम्यान अडिवरे, माळीणफाटा, आंबेगाव वसाहत, कोकणेवाडी, नवलेवस्ती या पाच ठिकाणी घोडेगांव पोलिस स्टेशनचे जीवन माने, पोलिस हवालदार जालिंदर रहाणे, स्वप्नील कानडे यांनी कारवाया केल्या. अडिवरे वांदरवाडी येथे दारू पाडण्यासाठी जमिन पुरलेले आठ प्लास्टिक बॅरल बाहेर काढून नष्ट केले. त्यांच्या या कारवाईमूळे याभागातील दारू बनविणा-यांवर मोठी जरब बसणार आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, यामध्ये अडिवरे जवळ वांदरवाडी येथे १०० लिटर कच्चे रसायन व वीस नवसागराच्या वड्या मिळून आल्या. याप्रकरणी दहा हजार पाचशे रूपयांचा माल बेकायदा व विनापरवानगीचा मिळून आल्याची तक्रार देण्यात आली आहे. यातील कच्चे रसायन जाग्यावरच  नष्ट करण्यात आले व दारू पाडण्यासाठी वापरात येणारे साहित्य फोडून टाकण्यात आले. यातील दारू पाडणारा यशवंत पवार याच्याविरूध्द व नवसागराच्या वाडया विकणारा संतोष जनरल स्टोअर अडिवरे या दुकानचा मालक जानकु तुकाराम शेळके यांच्या विरूध्द घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    माळीण फाट्याजवळ आमडे गावच्या हद्दीत १२५ लिटर कच्चे रसायन व २०  नवसागरच्या वडया मिळून आल्या. या प्रकरणी तेरा हजार रूपयांचा माल बेकायदा व वीना परवानगीचा मिळून आला. यातील कच्चे रसायनचा माल नष्ट करून दारू पाडणारा दिनेश पांडुरंग मुकणे याच्याविरूध्द व नवसागरच्या वडया विकणारा तांबोळी ट्रेडर्स, अडिवरे येथील फिरोज हसन तांबोळी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    बोरघर गावच्या हद्दीत नवलेवस्ती येथे ११० लिटर कच्चे रसायन व २० नवसागरच्या वडया व एक किलो काळा गुळ सापडल्या. याप्रकरणी आकरा हजार पाचशे पन्नास रूपयांचा माल बेकायदा व वीना परवानगीचा मिळून आला. यातील कच्चे रसायान जाग्यावर नष्ट करण्यात आले. तसेच दारू पाडणारा मोतीराम सावळेराम वाघ याला ताब्यात घेण्यात आले.त्याने नवसागर व गुळ कोकणेवाडी मधून आणत असल्याचे सांगितले. यावरून कोकणेवाडीतील सहयाद्रि सुपर मार्केटवर धाड मारली असता  नवसागर व गुळ मिळून आला. दुकानमालक ऋषीकेश दिगंबर कोकणे यांच्या विरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला.

    दारू तयार करणे व विक्री करणे यासोबतच ज्या दुकानातून किंवा व्यापारी यांच्याकडून त्यासाठी कच्च्या मालाचा पुरवठा केला जातो, त्यांच्यावरही गुन्हे दाखल केला आहे व यानंतरही अशा प्रकारचे व्यापारी तसेच बेकायदेशीरपणे दारू विक्री करणारी सरकारमान्य दुकानदारांवर गुन्हे दाखल करून त्यांना कठोर प्रतिबंधात्मक कारवाईद्वारे अवैध दारू विक्रीला पायबंद घालण्यासाठी घोडेगाव पोलीस ठाणे कटिबद्ध असल्याचे घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले.