शिरूर तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : खासदार  डॉ. अमोल कोल्हे

नारायणगाव :निसर्ग चक्रीवादळामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना आज दि३ जून ला

नारायणगाव :निसर्ग चक्रीवादळामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना आज दि३ जून ला पत्र पाठवून केली आहे.

आज निसर्ग चक्रीवादळाने मुंबई, कोकण परिसरात धडक दिल्यानंतर या चक्रीवादळाचा परिणाम पुणे जिल्ह्यात जाणवायला सुरुवात झाली होती. मात्र दुपारनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे व छप्परं उडून गेली. तसेच घरांचे, वाहनांचे व शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. जुन्नर तालुक्यात आंबा, ऊस आणि केळीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची तातडीने दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना पत्र पाठवून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला देण्याची मागणी केली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना निसर्ग चक्रीवादळामुळे मोठा फटका बसला असून त्यातून सावरण्यासाठी त्यांना प्रशासनाने मदत करण्याची गरज आहे असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. तसेच जुन्नर-आंबेगाव आणि खेडचे प्रांत अधिकारी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा डॉ. कोल्हे यांनी घेतला. उद्या सकाळपासूनच पंचनामे सुरू करण्याच्या सूचना डॉ. कोल्हे यांनी प्रांत अधिकारी यांना केल्या आहेत.  तसेच खेडच्या पश्चिमपट्ट्यात मोठे नुकसान झाले आहे. वहागाव येथील मंजाबाई नवले या महिलेचा मृत्यू झाला असून तीन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती खेडचे प्रांत संजय तेली यांनी दिली आहे. तसेच उद्या संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचनाही डॉ. कोल्हे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.