manohar mama

सध्या राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा मनोहर भोसले याने भविष्य सांगण्याच्या नावाखाली लाखो लोकांच्या पावतीवर आधारकार्ड क्रमांक घेऊन खाजगी डाटा गोळा केला असल्याचा दावा क्रांतीकारी आवाज संघटनेने केला आहे.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सध्या राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा मनोहर भोसले याने भविष्य सांगण्याच्या नावाखाली लाखो लोकांच्या पावतीवर आधारकार्ड क्रमांक घेऊन खाजगी डाटा गोळा केला असल्याचा दावा क्रांतीकारी आवाज संघटनेने केला आहे. मनोहर भोसले याची एका प्रसिद्ध मराठी मालिकेच्या निर्मात्याशी व्यावसायिक भागिदारी असल्याचे
    पुरावे या संघटनेच्या वतीने प्रसिद्धी माध्यमांकडे देण्यात आले आहेत.

    मनोहर भोसलेची ही कुकर्म थांबवण्यासाठी क्रांतिकारी आवाज संघटना पाठपुरावा करत आहे. मनोहर भोसले हा एका सरकारी पोर्टलचा गैरवापर करून लोकांची माहिती मिळवत तीच माहिती स्वतःची विद्या म्हणून लोकांना सांगत असतो, असा दावा क्रांतीकारी आवाज संघटनेचे कार्याध्यक्ष मच्छिंद्र टिंगरे यांनी केला आहे.

    बारामती येथे झालेल्या पत्रकार परिषदमध्ये त्यांनी आज हा गौप्यस्फोट केला आहे. मनोहर भोसले यांचे कार्यकर्ते लोकांकडून बाहेर महाराजांना भेटण्यासाठी पावती फाडत असतात. त्यावेळी पावतीवर नागरिकांचा आधार कार्ड नंबर व पॅन कार्ड नंबर टाकून घेतला जातो आणि भक्तांना दोन तास प्रतीक्षा करायला लावली जाते. दरम्यानच्या काळात ‘माय रेशन’ या शासकीय पोर्टलमधून संपूर्ण कुटुंबाची माहिती काढून तीच माहिती भक्ताला दिली जाते, अशी हातचलाखी करून मनोहर मामा भक्तांना उल्लू बनवत असल्याचा दावा क्रांतीकारी आवाज संघटनेने केला आहे.

    याशिवाय मनोहर भोसले याचा बॉडीगार्ड राघू देवकर हा पोलीस कर्मचारी मामाच्या भेटण्याच्या फीचे रक्कम स्वतःच्या अकाउंटवर घेत होता. त्याचे पुरावे या पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले. त्यामुळेच पाठीमागेच संशयाच्या भोवऱ्यात असलेला राघू देवकर हा आता आरोपी होण्याची चिन्ह दिसत आहेत.

    याशिवाय मनोहर भोसले ने बारामती तालुक्यातील सावंतवाडी गोजूबावी व करमाळा (जि.सोलापूर) उंदरगाव येथे बांधलेले दोन्ही मठ हे बेकायदेशीर आहेत. या दोन्ही मठाना कोणतेही परवानगी नाही किंवा या दोन्ही मठाची नोंद ग्रामपंचायत दप्तरी नाही. त्यामुळेच या मठाची घरपट्टी, पाणी पट्टी असा मिळकत कर ही बुडवाला आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीची पत्र क्रांतीकारी आवाज संघटनेचे कार्याध्यक्ष मच्छिंद्र टिंगरे यांनी पत्रकार परिषदमध्ये सादर केली आहेत.

    सोलापूर येथे दाखल झालेल्या बलात्कार प्रकरणातील महिलेचे भविष्य सांगताना मनोहर भोसले याने त्या महिलेला तुझे अनेकांशी अनैतिक संबंध असल्याचे चिठीत लिहून दिले होते. यात बारामती शहरातील एका राजकीय नेत्याचे नावं टाकल्याने मनोहर मामाने बारामती मध्ये स्वतःच्या अडचणी वाढवून ठेवल्या आहेत.

    दुसरीकडे क्रांतीकारी आवाज संघटनेने पहिल्यापासून दावा केला होता की. बाळुमामाच्या नावानं चांगभलं, रात्रीस खेळ चाले, 100 डे या मालिकांना पैसा पुरविला आहे, याचा निर्माता संतोष गजानन आयचीत हा मनोहर भोसलेचा व्यावसायिक पार्टनर आहे. बारामती येथील गुन्ह्यात जप्त केलेली गाडी ही संतोष आयचित याच्या नावावर आहे. त्यामुळेच बेकायदा मार्गाने जमवलेल्या पैशात संतोष आयचीत देखील भागीदार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

    एवढी प्रॉपर्टी आली कुठून?

    मनोहर भोसले हा २०१३ पर्यत झोपडीत राहत होता. आज त्याने पत्नीच्या नावावर ४४ लाख रुपये किंमतीची २७एकर जमीन, उंदरगाव येथे दीड एकर जमीन, उंदरगाव येथे एक हजार स्क्वेअर फूट चा बंगला, उंदरगाव येथे मठ, बारामती येथे मठ, महागडे फर्निचर, महागडे मोबाईल, लाईट पाणी, संरक्षक भिंती, असा खर्च कुठून होतो असा प्रश्न क्रांतीकारी आवाज संघटनेने विचारला आहे.

    मनोहर भोसले यांनी रजिस्टर केलेली शिवसिद्धी संचालित मामा संस्था ही बारामतीत रजिस्टर असताना देणग्या मात्र उंदरगाव येथे गोळा केल्या जात आहेत. शिवाय या देणग्या कशासाठी गोळा केल्या जात आहेत, याचे कारण पावतीवर नमूद केले नाही, असे मत मच्छिंद्र टिंगरे यांनी पत्रकार परिषदमध्ये व्यक्त केले आहे. या पत्रकार परिषदेस मच्छिंद्र टिंगरे, नानासाहेब साळवे, आकाश दामोदरे आदी उपस्थित होते.