manohar mama

बाळू मामांचे वंशज म्हणवणारे मनोहरमामा(Manohar Mama Press Conference) उर्फ मनोहर भोसले यांच्याविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात (Baramati Police Station)तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    पुणे : बाळू मामांचे वंशज म्हणवणारे मनोहरमामा(Manohar Mama Press Conference) उर्फ मनोहर भोसले यांच्याविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात (Baramati Police Station)तक्रार दाखल करण्यात आली आहे. मनोहर भोसले यांनी अंधश्रद्धेतून फसवणूक(Fraud) करत ४० लाख रुपयांचे रो हाऊस घेतल्याचं या तक्रारीत म्हटले आहे. बारामतीतील महेश आटोळे यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, मनोहर भोसले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

    बारामती तालुक्यातील महेश आटोळे यांनी मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले यांनी अंधश्रद्धेतून फसवणूक झाल्याची तक्रार बारामती तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, माझ्याकडून त्यांनी ४० लाख रुपयांचे रो हाऊस घेतले. मात्र माझी कुठलीच कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे मी दिलेले रो हाऊस मनोहर मामा यांना परत मागितला. मात्र रो हाऊस मी तुला देणार नाही, कारण तुझ्या तंत्रविद्या करण्यात माझे लाखो रुपये खर्च झाले आहेत. तू मला ते पैसे परत कर त्यावेळेसच मी रो हाऊस परत करेन, असं मनोहर मामा यांनी सांगितले. यामुळे आटोळे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

    दरम्यान, मनोहर मामा यांनी आटोळे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. मनोहर मामा यांच्यावर गेल्या काही दिवसांत अनेक प्रकारचे आरोप झाले आहेत. सध्या ते फरार असल्याचं बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर स्वत:ची बाजू मांडण्यासाठी ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मी कुठेही फरार झालो नाही. तिरुपतीला गेलो होतो. आज आपल्यासमोर आहे. माझ्यावरील आरोप तथ्यहीन आहेत. माझ्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न आहे. करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माझी विनाकारण बदनामी सुरु असल्याचं मनोहर मामा यांनी म्हटलंय.

    मी बाळूमामा यांचा वंशज नाही. मी त्यांचा भक्त आहे. गावातील लोकांनी केलेले आरोप खोटे आहेत. माझी शेती आहे. माझ्याकडे गोकूळ दुधाची एजन्सी आहे. मालिकांसाठी मार्गदर्शन करतो, त्यातून माझ्याकडे इतकी संपत्ती आलीय. मी ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून लोकांचं भविष्य सांगतो. कुठल्याही प्रकारची बुवाबाजी करत नाही, असा दावाही मनोहर मामा यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मी माझ्या कामानिमित्त गेलो होतो. या व्यतिरिक्त त्यांचे आणि माझे काही संबंध नाहीत. गावातील भावकी, तसंच पार्किंगच्या वादातून आपल्यावर हे आरोप केले जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच आपली बदनामी करणाऱ्यांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानाचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय.