मनोहरमामा भोसले याला पाच दिवसांची पोलिस कोठडी

बारामती शहरातील शशिकांत खरात यांच्या वडीलांना थायरॉईड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे खरात हे मनोहरमामा भोसले या भोंदुबाबाच्या सावंतवाडी, गोजूबावी (ता. बारामती, जि. पुणे) मठामध्ये गेले. त्याने तो बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कॅन्सर रुग्णास बरा करण्याची भूलथाप मारुन, बारामती शहरातील एका भक्ताची २ लाख ५१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनोहर मामा भोसले (रा.उंदरगांव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे गिऱ्हे यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

    बारामती शहरातील शशिकांत खरात यांच्या वडीलांना थायरॉईड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे खरात हे मनोहरमामा भोसले या भोंदुबाबाच्या सावंतवाडी, गोजूबावी (ता. बारामती, जि. पुणे) मठामध्ये गेले. त्याने तो बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला. तक्रारदार यांच्या वडीलांचा गळयावरील थायरॉईड कॅन्सर बरा करतो, असे सांगून त्यावरील औषध म्हणून बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला.तसेच विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत संगनमत करून वेळोवेळी चढावा, अभिषेक व भेटीसाठी त्यांचेकडून एकुण २ लाख ५१,५०० रुपये त्यांचे व त्यांच्या वडीलांच्या जिवाचे बरे वाईट होईल, अशी भिती घालून देण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली आहे. पैसे परत मागितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे खरात यांनी फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

    शुक्रवारी (दि १०) दुपारी तीन वाजता मनोहर मामा भोसले याला बारामती तालुका पोलिस व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून अटक केली. शनिवारी (दि ११) सकाळी मनोहरमामा भोसले याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्या. ए. जे गिऱ्हे यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने ऍड. किरण सोनवणे यांनी बाजू मांडली. पोलिस प्रशासनाच्या पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी बाजू मांडली.