पुण्यात मेट्रो अखेर धावली; अजित पवारांच्या हस्ते ट्रायल रनचे उद्घाटन

    पुणे : पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते, या ऐतिहासिक नगरीचा, आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या कामाचा, आजच्या ट्रायल रनचाही उल्लेख करावा लागेल. ‘मेट्रो’मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊन पोहचले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केले. पुणे मेट्रोने उर्वरीत काम जलद गतीनं पूर्ण करावे, कोणत्याही परिस्थितीत मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

    पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पूर्ण झालेल्या मार्गिकेवरील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून सकाळी सात वाजता केले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिदधार्थ शिरोळे, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आमदार चंद्रकांत पाटील व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे उपस्थित होते.

    वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होईल

    पुणे मेट्रोची, सगळ्या मार्गांची कामे पूर्ण होऊन, ही मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेनं सुरु झाल्यानंतर, सायकल, मोटरसायकल, दुचाकीचं शहर अशी ओळख असणारं पुणे शहर, हे मेट्रो वाहतुकीचं शहर म्हणून ओळखलं जाईल. पुणे मेट्रोमुळे रस्त्यांवरचा वाहनांचा, वाहतुकीचा, प्रदुषणाचा ताणकमी होईल. वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होईल. पुणेकर त्यांच्या निर्धारित ठिकाणी, निर्धारीत वेळेत पोहचू शकतील, दुसऱ्याला दिलेली वेळ आणि वेळेचं गणित, पुणेकर भविष्यात पाळू शकतील,  असा विश्वास व्यक्त करतानाच मेट्रो रेल्वेसेवा ही प्रदुषणविरहीत सेवा असल्याने  प्रदुषण होणार नाही. रस्त्यांवरची वाहने  कमी झाल्याने, त्या माध्यमातून होणारे प्रदुषणही कमी होईल.  पुणे शहर आणि परिसरातली वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पुण्याभोवती रिंग रोड करण्यात येणार आहे. वाहतुकीची समस्या हीच पुणे शहाराची प्रमुख समस्या आहे. पुणे मेट्रोच्या माध्यमातून ती काही प्रमाणात निश्चितच सुटेल.

    – अजित पवार, उपमुख्यमंत्री

    मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही

    कोणत्याही परिस्थितीत पुणे मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,पुणे मेट्रो पुणे शहरातून ३३.२० किलोमीटर अंतर धावणार आहे. या मेट्रोलाईनवर ३० मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या एकूण लांबीपैकी, २७.२८ किलोमीटर मेट्रो रस्त्याच्या समांतर पूलावरुन धावणार आहे. तर पुण्याच्या खालून बोगद्यातून ६ किलोमीटर मेट्रो धावणार आहे. आतापर्यंत पुणे मेट्रोच एकूण काम जवळपास ६० टक्के पूर्ण झालं आहे. पुणे मेट्रोनं उर्वरीत काम जलद गतीनं पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

    पुणे मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास सुलभ व सुरक्षित होणार आहे, आयटीचे क्षेत्र म्हणन पुणे शहर प्रभाव वाढवते आहे, त्यात मेट्रोची भर पडणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो निश्चितपणे महत्त्वपूर्ण ठरेल,  दिल्ली, नागपूरकरांचा मेट्रोचा अनुभव चांगला आहे, आता हाच अनुभव पुणेकराना अनुभवण्यास मिळणार आहे.

    – डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद

    महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे महानगरात मेट्रो ट्रायल रन हा ऐतिहासिक क्षण आहे. केंद्र व राज्य शासनाने मेट्रोच्या कामाला गती दिल्याने हा क्षण आज अनुभवता आला. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विचार करता आजच्या मेट्रो ट्रायल रनचे महत्तपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरात मेट्रो ट्रायल रन हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे.  डिसेंबर २०२२ पर्यंत मेट्रोचे सर्व मार्ग सुरू होतील, त्यामुळे पर्यावरणास मदत होईल सोबतच वाहतूक कोंडीला पर्याय असेल, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केले.