मेट्रोकडे कामासाठी अवघे १३०० कामगार

महामेट्रोच्या कामावर होणार परिणाम पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या २८०० पैकी १५०० कामगारांनी घरचा रास्ता धरला आहे. त्यामुळे मेट्रोकडे कामासाठी अवघे १३०० कामगार राहिले आहेत. याचा परिणाम

महामेट्रोच्या कामावर होणार परिणाम

पुणे :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या २८०० पैकी १५०० कामगारांनी घरचा रास्ता धरला आहे. त्यामुळे मेट्रोकडे कामासाठी अवघे १३०० कामगार राहिले आहेत. याचा परिणाम महामेट्रोच्या कामावर होणार असून प्रकल्प लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शहरात कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मेट्रोचे काम २५ मार्चपासून बंद होते. मेट्रो मार्गांसाठी सुमारे २८०० मजूर मेट्रोकडे होते. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आदी ठिकाणांहून हे मजूर आलेले होते. लॉकडाउनच्या काळात दहा ठिकाणी राहत असलेल्या मेट्रोच्या लेबर कॅपमधील मजुरांना महामेट्रोने धान्यासह जीवनावश्यक वस्तू पुरविल्या होत्या. त्यामुळे मजूर थांबलेले होते. तसेच काम बंद असले तरी, त्यांना मजुरीही देण्यात येत होती.

केंद्र सरकारने सुमारे १२ दिवसांपूर्वी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या सुरू केल्या. या गाड्या सुरू झाल्यावर मजुरांमध्ये चुळबूळ सुरू झाली. त्यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या आठ दिवसांत महामेट्रोच्या लेबर कँपमधून सुमारे १५०० कामगार निघून गेले आहेत. सध्या महामेट्रोकडे १२८७ कामगार आहेत. गावी गेलेल्या कामगारांमध्ये कुशल आणि अकुशल कामगारांचा समावेश आहे. मेट्रो प्रकल्पासाठी परराज्यातील लेबर कॉन्ट्रॅक्टरकडून मजूर पुरविले जातात. येताना त्यांच्यामार्फत आलेले मजूर जाताना स्वतंत्रपणे निघून गेले आहेत.

त्यामुळे आता काम जोरात सुरू झाले मात्र, मनुष्यबळाची टंचाई महामेट्रोला भासू लागली आहे.मेट्रो प्रकल्प लांबणार मेट्रोचा प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. लॉकडाउनमुळे सलग ३५ दिवस काम झालेले नाही. तसेच नंतरचे १५ दिवसही मर्यादीत स्वरूपात काम झाले आहे. पुढील काळातही मेट्रोला मजुरांची उपलब्धता कशी होईल, यावर प्रकल्पाचा वेग अवलंबून असेल. परिणामी मेट्रो प्रकल्पाचा कालावधी लांबणार आहे. परंतु, तो किती असेल, हे येत्या काही दिवसांतील घडामोडींवर अवलंबून असेल.