सामाईक सांडपाणी केंद्राचा नव्याने ‘डीपीआर’; सुभाष देसाई यांचे एमआयडीसीला निर्देश

  पिंपरी : महापालिका हद्दीमधील एमआयडीसी कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या उद्योगधंद्यांमधून किती प्रमाणात सांडपाणी तयार होते, याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहायाने पुनर्पडताळणी करावी. त्यानुसार सुधारित डीपीआर तयार करावा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने मुख्य अभियंता (मुख्यालय), मुख्य अभियंता (पुणे), अधीक्षक अभियंता मंडळ पुणे, विशेष कार्य अधिकारी (पर्यावरण) मुंबई, प्रादेशिक अधिकारी पुणे यांची समिती स्थापन करुन त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र औद्योगिक मंडळाला दिले आहेत.

  पिंपरी-चिंचवड एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक पाण्याचा वापर होत आहे. कंपन्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार रसायनमिश्रित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाव्दारे शुध्द करुन नदीत सोडण्याचे आदेश दिले आहेत, तरीही अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांचे रसायनयुक्त सांडपाणी नदीत मिसळत आहे. या पार्श्व भूमीवर २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार लक्ष्मण जगताप यांनी सूचना केली होती. यावर उद्योगमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

  ज्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प आहेत आणि ज्यांचे नाहीत तेही मध्यरात्री राजरोजसपणे पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडतात. यामुळे नदीतील पाणी दूषित होऊन जलपर्णीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्ततेतून रसायन प्रक्रिया प्रकल्प उभा करण्याचे नियोजन झाले असतानाही याबाबत अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असेही जगताप यांनी म्हटले आहै.

  ठळक मुद्दे

  १) महापालिका हद्दीत १२२४.१२ हेक्टर औद्योगिक क्षेत्र
  २) एमआयडीसीचे रावेत येथे जलशुद्धीकरण केंद्र
  ३) जलशुद्धीकरण वेंâद्राची क्षमता प्रति दिन १२० द.ल.लि.
  ४) महापालिकेला प्रतिदिन ३७ द.ल.लि.पाणीपुरवठा
  ५) औद्योगिक ग्राहकांना ६३ द.ल.लि पाणीपुरवठा
  ६) पिंपरी – चिंचवड परिसरात २८०० उद्योगधंदे
  ७) टाटा मोटर्स, सेंच्युरी एन्का, थरमॅक्स यांचा पाणीवापर ५ द.ल.लि.
  ८) या बड्या कारखान्यांचे स्वत:चे सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित
  ९) सद्यस्थितीत ०.१० द.ल.ली. सांडपाण्याची निर्मिती
  १०)सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचे २०१३ पासून प्रस्तावित
  ११) सामाईक सांडपाणी केंद्रासाठी १ रुपया नाममात्र दराने भूखंड
  १२) भोसरीतील टी भूखंडावर केंद्रासाठी ६ हजार चौ.मी.जागा निश्चिती
  १३) ३६ द.ल.ली.प्रतिदिन क्षमतेचे सांडपाणी केंद्र उभारण्याचा ‘डीपीआर’
  १४) धातू व सांडपाणी एकत्रिकरण नको
  १५) प्रदूषण नियंत्रण महामंडळ प्रस्तावाची फेरपडताळणी करणार