‘तुम्हाला बघून घेतो…’; पोलिसांनाच धमकी देणारा आरपीआयचा पदाधिकारी अटकेत

    शिक्रापूर : शिक्रापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक शिवराम खाडे यांना अरेरावी करत अंगावर धावून जाऊन सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना रविवारी (दि. १३) घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीचे शिरुर तालुकाध्यक्ष भूषण गायकवाड व कार्याध्यक्ष जितेंद्र वाढवे यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांना अटकही करण्यात आली.

    शिक्रापूर पोलिस ठाण्याचे शिवराम खाडे हे सेवेत असताना भूषण गायकवाड, जितेंद्र वाढवे तसेच एक अनोळखी व्यक्ती खाडे यांच्याजवळ आले. यावेळी गायकवाड याने एक अर्ज देत या अर्जावर काय कारवाई केली सांगा, असे म्हणाला. यावेळी खाडे यांनी आज रविवार आहे. आमच्या बारनिशी विभागाच्या काम पाहणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांची सुट्टी आहे. त्यामुळे त्यांनी तक्रार अर्ज कोणाकडे दिला माहिती नाही. त्या आल्यानंतर मी अर्ज कोणाकडे दिला, हे चौकशी करून तत्काळ कारवाई करण्यास सांगतो, असे म्हटले.

    त्यानंतर भूषण गायकवाड हा शिवराम खाडे यांच्याशी मोठ्याने बोलून मला एसपी ऑफिसला जावे लागेल, असे म्हणू लागला. दरम्यान, खाडे यांनी तुम्ही कायदेशीर जे असेल ते करता सध्या माझा महत्वाच्या गुन्ह्याचा तपास सुरु असून, तुम्ही मला काम करू द्या असे म्हटले. त्यानंतरही गायकवाड याने त्याने दाखविलेल्या तक्रारी अर्जाचा विषय सोडून इतर बाबींबाबत वाद घालू लागला. तसेच गायकवाड याने मोबाईल काढून मोठमोठ्याने बोलून गोंधळ घालून पोलीस ठाण्याच्या आवारात व्हिडिओ शुटिंगही केले. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

    खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गायकवाड यास रोखले असताना त्याने मी माझी संघटना बोलावून घेतो. तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी दिली. पोलिस ठाण्यात हजर असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकने, पोलीस शिपाई किशोर शिवणकर, नीरज पिसाळ, अतुल पखाले, कृष्णा व्यवहारे यांनी भूषण गायकवाड व जितेंद्र वाढवे यांना पकडले. त्यांच्यासोबत आलेला अनोळखी इसम पळून गेला.

    याबाबत शिवराम विक्रम खाडे (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने भूषण एकनाथ गायकवाड रा. कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीचे शिरुर तालुका कार्याध्यक्ष जितेंद्र दामोदर वाढवे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे तसेच एक अनोळखी युवक यांच्यावर गुन्हे दाखल करत भूषण गायकवाड व जितेंद्र वाढवे यांना अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके व पोलिस नाईक प्रताप कांबळे हे करत आहे.