वर्दीतील माणुसकी ! हरविलेले रॅकेट शोधण्यासाठी ‘तिने’ घेतली थेट पोलिस आयुक्तालयात धाव अन् मग…

वेगवेगळ्या स्पर्धा तिने गाजवत आज आंतरराष्ट्रीय खेळाडू असा लौकिक मिळवला आहे.

    पुणे : सर्वसामान्य कुटुंबातून अवघ्या १७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टेनिसपट्टू झालेल्या ‘तिच’ रक्षाबंधनासाठी आल्यानंतर रिक्षा प्रवासात रॅकेट विसरतं. तसं, टेनिसपट्टूसाठी रॅकेट नवीन घेणं अवघड नाही. पण, हे रॅकेट वडिलांनी काबाड कष्ट करून तिला दिल होतं. त्यामुळे ते तिला खुपच जवळचही होतं अन् ते पुन्हा घेणं तितकच अवघडही. रॅकेट हरविल्यापासून तिला अश्रू अनावर झाले होते. ते मिळवण्यासाठी ती वनवन फिरली. पण, मिळाले नाही. स्थानिक पोलीसांकडे देखील गेली. पण त्यांनी तितकस मनावर घेतलं नाही. मग, त्यांनी पोलीस आयुक्तालयात धाव घेत गुन्हे शाखेला मदत मागितली. गुन्हे शाखेने तिचं ते रॅकेट परत मिळवूनही दिलं. यावेळी तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दरवळे, हे चित्र पाहून पोलीस देखील भावनिक झाले होते.

    राधिका राजेश महाजन अस या मुलीचं नाव आहे. राधिका ७ वर्षांपासून टेनिस खेळते. तिनं या खेळालाच आपलं ध्येय बनवलं आहे. वेगवेगळ्या स्पर्धा तिने गाजवत आज आंतरराष्ट्रीय खेळाडू असा लौकिक मिळवला आहे. अवघ्या १७ वर्षांची राधिका वेगवेगळ्या देशात स्पर्धांसाठी जात असते. दरम्यान, ती पीएमसी कॉलनीशेजारी राजेंद्रनगर येथे राहते. सर्व सामान्य कुटुंबात वाढलेली राधिका जिद्दीने टेनिस खेळते. तिला ग्रँड स्लॅम व ऑलिम्पिक स्पर्धा जिंकायची आहे. सध्या ती चेन्नई येथील स्पर्धेत खेळत आहे.

    दरम्यान, ती रक्षाबंधनासाठी २२ ऑगस्ट रोजी चेन्नई येथून वडिलांसोबत बसने पुण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालय येथे उतरली. रिक्षाने दोघेही घरी गेले. पण, बॅगा काढून घेतल्यानंतर तीच रॅकेट रिक्षात विसरल. रिक्षा चालक तर निघून गेला. काही वेळाने त्यांना रॅकेट नसल्याचे लक्षात आले. मग, त्यांची धावधाव सुरू झाली. रॅकेट सापडत नसल्याने राधिकाचा बांध फुटला होता. ती रात्रभर रडत होती. त्यामुळे कुटुंबीय देखील दुखी होते. तिला शुक्रवारी हैद्राबाद येथे स्पर्धा खेळण्यास जायचे होते. त्यामुळे त्यांनी संबंधित पोलीस ठाणे गाठले. त्यांना घटनेची माहिती दिली. पण, त्याकडे गांभिर्याने पाहिले गेले नाही. मग, त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना माहिती दिली.

    पोलीस आयुक्तांनी तिची जिद्द पाहून तात्काळ अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना रॅकेटचा शोध घेण्याची सूचना केली. गायकवाड यांनी कर्मचारी विशाल दळवी यांच्या मदतीने रॅकेटचा शोध सुरू केला. त्यांनी बंडगार्डन ते घर असा सर्व प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी एका ठिकाणी रिक्षाचा क्रमांक दिसून आला. रिक्षा चालकाचा नाव व मोबाईल क्रमांक मिळवला. त्यानंतर त्याच्याशी संपर्क साधला. त्याने रॅकेट असल्याचे सांगितले.

    पोलिसांनी हे रॅकेट घेऊन राधिका व तिच्या वडिलांना फोनकरून रॅकेट मिळाल्याचे सांगितले. त्यांनी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. यावेळी राधिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू दरवळले होते. महाजन कुटुंबाने पोलीसांचे मनापासून आभार मानले. तसेच, पोलीस आयुक्तांना पत्र लिहून पुणे पोलीसांचे आभार मानले.