चिंचवडच्या नागरिकांच्या आरोग्यासाठी सरसावले आमदार लक्ष्मण जगताप

    पिंपरी : भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी प्रत्येक प्रभागात “अटल प्रभाग आरोग्यालय योजना” राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक प्रभागातील नागरिकांची मोफत बाह्यरुग्ण तपासणी व मोफत औषधांचे वाटप केले जाणार आहे. प्रभाग क्रमांक २२, काळेवाडी येथे महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सोमवारी (दि. १४) या योजनेला सुरूवात करण्यात आली.

    पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आमदार जगताप हे नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. महाआरोग्य शिबिर असो की राज्य व केंद्र सरकारच्या विविध आरोग्य योजनांमार्फत आमदार जगताप यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. विविध आरोग्य उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी शहरातील अनेक गरजू रुग्णांना मोठ्या आजारांवर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने आर्थिक नियोजन कोलमडलेल्या सामान्य नागरिकांना आरोग्य दिलासा देण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात “अटल प्रभाग आरोग्यालय योजना” राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

    या योजनेंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांची मोफत बाह्य रुग्ण तपासणी तसेच त्यांना मोफत औषध वाटप केले जाणार आहे. प्रत्येक प्रभागात अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहेत. त्याचप्रमाणे किडनी ट्रान्सप्लांट, कॅन्सर, ह्दयाचे आजार, लहान बालकांना असलेले विविध आजार, खुब्यावरील शस्त्रक्रिया, मणक्याची शस्त्रक्रिया यांसारख्या मोठ्या खर्चिक असणाऱ्या शस्त्रक्रिया सुद्धा मोफत केल्या जाणार आहेत. प्रभागांमध्ये राबवण्यात येणारी “अटल प्रभाग आरोग्यालय योजना” ही वर्षभर मोफत राबवण्यात येणार आहे. कोरोना नियमांचे पालन करून ही योजना राबविली जाणार आहे.

    या योजनेचा महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक २२, काळेवाडी येथे सोमवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रभागाच्या नगरसेविका नीता पाडाळे, नगरसेविका सुनिता तापकीर, नगरसेवक सुरेश भोईर, डॉ. दिनेश फस्के, डॉ. विशाल पटेल आदी उपस्थित होते.