आमदार साहेब हे वागणं बरं नव्हं ! भाजप आमदार राम सातपुते यांच्या विवाह सोहळ्यातच कोरोनाच्या नियमांना केराची टोपली

माळशिरस विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार राम सातपुते विवाहबंधनात अडकले. पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये अत्यंत थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. मात्र सातपुतेंच्या विवाह सोहळ्यात कोरोनाच्या नियमांना केराची टोपली दाखवल्याचं पाहायला मिळालं.

माळशिरस विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार राम सातपुते विवाहबंधनात अडकले. पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये अत्यंत थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. मात्र सातपुतेंच्या विवाह सोहळ्यात कोरोनाच्या नियमांना केराची टोपली दाखवल्याचं पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार नितेश राणे, प्रशांत परिचारक यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळीनी हजेरी लावली होती. या लग्नसमारंभादरम्यान नेतेमंडळींनीच तोंडाला मास्क लावला नसल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या संख्येने गर्दी असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचाही बोजवारा उडाला.

 

सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभांसाठी जास्तीत जास्त २०० लोकांची उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. परंतु यावेळी उपस्थितांची संख्या हजारोंवर होती. तसंच लग्नसमारंभात असलेल्या बैठक व्यवस्थेमध्येही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करण्यात आलं नसल्याचंही दिसून आलं. नेते मंडळींनीच कोरोनाविषयक नियम मोडल्याचे यावेळी दिसून आले. कोरोनाचे नियम मोडल्यास सामान्यांवर कारवाई होते तर मग या सामान्यांतून निवडून आलेल्या ‘सामान्यां’वर कारवाई होणार का? असा संतप्त सवाल सोशल मीडियावर अनेकजण करत आहेत