सिंहगड रोडवर टोळक्यांची दहशत; परिसरात घबराट

माणिकबाग परिसरात टोळक्याने दहशत करून दोघांना मारहाण केल्याची घटना घडली. टोळक्याने परिसरातील गाड्यांवर दगडफेक केली. रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या दुचाकी खाली पाडून टोळक्याने दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद केली.

    पुणे: सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात टोळक्याने दहशत करून दोघांना मारहाण केल्याची घटना घडली. टोळक्याने परिसरातील गाड्यांवर दगडफेक केली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी पाच जणांना अटक करण्यात आली.
    ओंकार प्रकाश राक्षे (वय २१), सुहास रघु गाडे (वय २३), कुणाल रवींद्र राशीनकर (वय १८), वैभव चंद्रकांत पवळे (वय १८, चौघे रा. वडगाव बुद्रुक), शाहू संजीवन देशमुख (वय २१, रा. आंबेगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
    याप्रकरणी आकाश जागडे (वय २१, रा. धायरी) याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जागडे रात्री दहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातून दुचाकीवरून जात होता. त्यावेळी भगवा चौक परिसरात गर्दी झाली होती. टोळक्यातील काही जण एकाला मारहाण करत होते. त्यामुळे या भागात गर्दी जमली होती. जागडे आणि त्याचा मित्र आकाश पासलकरने टोळक्यातील काही जणांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर टोळक्याने जागडे आणि पासलकर यांना मारहाण केली. रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या दुचाकी खाली पाडून टोळक्याने दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद केली. त्यानंतर टोळक्यातील काही जण दुचाकीवरून पसार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पसार झालेल्या ५ जणांना अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक धोत्रे तपास करत आहेत.