एसटी बसमध्ये जागा पकडणे महिलेला पडले महागात; झालं असं काही…

    जुन्नर : येथील नवीन एसटी बसस्थानकात एसटी बसमध्ये जागा धरण्याची शक्कल जळवंडी ता. जुन्नर येथील महिलेला चांगलीच महागात पडली. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (दि.10) रोजी दुपारी ही घटना घडली. गणेश स्थापनेमुळे एसटी बस स्थानकावर विविध ठिकाणी जाणाऱ्यांची मोठी गर्दी होती.

    बसमध्ये बसून प्रवास करावा, अशी प्रत्येक प्रवाशाची इच्छा असते. यातून बसमध्ये जागा मिळविण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या जातात. कोणी चालकाच्या दरवाजातून तर काही पाठीमागील खिडकीतून आत प्रवेश करत असतानाचे चित्र गर्दीच्या वेळी हमखास पाहावयास मिळते. काहीजण खिडकीतून सीटवर रुमाल, टोपी, बॅग, पिशवी टाकून जागेचा हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात.

    जुन्नर-देवळे एसटी बसमध्ये गर्दीमुळे असाच काही प्रकार सुरू होता. जळवंडी येथील राजश्री नागेश सोनवणे या महिलेने खिडकीतून आपली पिशवी सीटवर टाकून जागा आरक्षित केली. मात्र, दरवाजातून आत जात सीटवर असणारी पिशवी त्यांनी हातात घेतली. यावेळी त्यातील आपला दहा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

    याबाबत त्यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीची फिर्याद दिली असून, जुन्नर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास जुन्नर पोलीस करीत आहेत.