गजा मारणेच्या मिरवणुकीतील समर्थकांवर कारवाईसाठी तपासणार मोबाईल रेकॉर्ड

कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या मिरवणुकीत सामील असलेल्या त्याच्या इतरही समर्थकांवर कारवाई करण्यासाठी तळोजा कारागृह ते पुणे या मार्गावर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या मोबाईलचे रेकॉर्ड तपासले जाणार आहे. त्या आधारावर त्यावेळेत तेथून गेलेल्या वाहनांतील व्यक्तींंची चौकशी करून कारवाई केली जाणार आहे,

    पिंपरी (Pimpri).  कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या मिरवणुकीत सामील असलेल्या त्याच्या इतरही समर्थकांवर कारवाई करण्यासाठी तळोजा कारागृह ते पुणे या मार्गावर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या मोबाईलचे रेकॉर्ड तपासले जाणार आहे. त्या आधारावर त्यावेळेत तेथून गेलेल्या वाहनांतील व्यक्तींंची चौकशी करून कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

    गजानन मारणे याची १५ फेब्रुवारी रोजी तळोजा कारागृहातून सुटका झाली. त्यानंतर त्याच्या टोळीने शेकडो मोटारींच्या ताफ्यात तळोजा ते पुणे अशी मिरवणूक काढली. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्यावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी मारणेसह त्याच्या साथीदारांनी दहशतीचे वातावरण निर्माण करून एका मॉलमधील पाण्याच्या बाटल्या आणि वडापाव लुबाडले. याप्रकरणी शिरगाव व हिंजवडी पोलिस ठाण्यात दरोडा, दंगा माजविणे असे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात शिरगाव पोलिसांनी अद्यापपर्यंत १४ वाहने जप्त केली असून ३६ जणांना अटक करण्यात आली आहे.

    यासह इतर आरोपींचाही शोध घेतला जाणार आहे. यासाठी तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजा मारणे याच्या मोबाईलवर आलेले फोन तसेच त्यावेळेत तळोजा कारागृह ते पुणे या मार्गावर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या मोबाईलचे रेकॉर्ड तपासले जाणार आहे. यासह सीसीटीव्ही फुटेज  तपासणीचे काम सुरु आहे. या आधारावर मारणे याच्या मिरवणुकीत सामील असलेल्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच मारणे टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्याअंतर्गत कारवाईची प्रक्रीया सुरू केली जाणार असल्याचेही कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले.