पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनचालकांना अडवून लुटमार करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

  इंदापूर : इंदापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे १० वर्षांपासून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडवून लुटमार करणाऱ्या पवार टोळीवर ‘मोक्का’अंर्तगत कारवाई करण्यात आली आहे.

  राहुल बाळासाहेब पवार, गणेश बाळासाहेब पवार, पिनेश उर्फ दिनेश उर्फ मयुर महेंद्र धाईजे, विवेक पांडुरंग शिंदे, सागर नेताजी बाबर अशी या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. त्यांच्यावर २०११ ते १३ मे २०२१ या कालावधीत दरोडा टाकणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, अवैध सावकारी करणे, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, हाणामारी करणे अशाप्रकारचे एकूण ११ गुन्ह्यांची नोंद आहे.

  आरोपींनी संघटितपणे गुन्हे केले असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्या टोळीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिले. त्यानुसार इंदापूरचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे त्याबाबतचा प्रस्तावही दिला. ही टोळी सध्या गजाआड असून, बारामती विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामतीचे अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, बारामती विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, इंदापूरचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक धनवे, बिरप्पा लातुरे, फौजदार धोत्रे, सहाय्यक फौजदार जगताप, ठोंबरे, तांबे, हवालदार दीपक पालके, पोलिस नाईक संजय जाधव, विनोद पवार, मोहिते, मोहळे, पोलिस शिपाई केसकर, अमोल गारूडी, विक्रम जमादार, मोरे यांनी मोक्काअंर्तगत कारवाई केली.

  दरम्यान, अशाच प्रकारची कडक कारवाई इतर गुन्हेगारांवर करण्यात येणार आहे. वाळू चोरांवरही लवकरच मोक्कासारखी कडक कारवाई करण्यात येणार आहे. जवळपास २५ वाळूचोरांना तडीपार करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली.

  गुन्हेगारी पार्श्वभूमी

  सन २०११ मध्ये या टोळीने एक जणास हॉकी स्टीकने डोक्यात मारहाण करुन भांडणे केली होती. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या इतरांनाही हाताने, लाथाबुक्याने मारहाण केली होती. त्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर ही टोळी समोर आली. २०१४ मध्ये या टोळीने नगरपरिषदेसमोर लावलेली एक पियाजो रिक्षा चोरुन नेली होती. २०१५ मध्ये बेकायदेशीर जमाव जमवून गणपती विसर्जन मिरवणुकीच्या कारणावरून दंगल करुन दगड, विटा, लाथाबुक्क्या व फायटरने मारामारी करून गोंधळ घातला होता. २०१६ मध्ये या टोळीने दुकानदारास खंडणी मागितली होती. मात्र, ती देण्यास नकार दिल्याने दुकानाच्या काचा फोडून दुकानातील गल्ल्यातील पैसे काढून घेतले. याबाबत गुन्हा दाखल आहे.

  सन २०१७ मध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्कामाच्या काळात यात्रेमध्ये पाळण्यात बसण्याचे कारणावरून पवार टोळीने काही जणांना जातीवाचक अपशब्द वापरून गज व कोयत्याने मारहाण केली होती. रिव्हॉल्वर रोखून गोळ्या घालण्याची धमकी देत, दहशत माजवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे ठार माण्याचा प्रयत्नही केला होता. सन २०१८ मध्ये या टोळीने इंदापूर शहरातील औषधाची दुकाने फोडून औषधांसह संगणक, रोख रक्कम, मोबाईल हँडसेटची चोरी केली होती. सन २०२० मध्ये या टोळीने बेकायदेशीर जमाव जमवून कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करुन लोकांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. टोळीने अकलूज रस्त्याने जाणाऱ्या लोकांची दुचाकी व रिक्षा अडवून त्यांच्याकडील घड्याळ, पैसे जबरीने काढून घेत मारहाण केल्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे. रिक्षाचा वापर करून शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरुन नेल्याचा प्रकारही या टोळीने केला आहे.

  असे अडकले जाळ्यात…

  १३ मे २०२१ रोजी पहाटे साडेपाचच्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हिंगणगावच्या जवळ असणाऱ्या सोनाई पेट्रोल पंपाजवळ दुचाकीवरुन आलेल्या एकाला इंडिका कार (एम.एच. १२/बी.पी.४३४५) मधून आलेल्या पाच जणांनी ‘कारला का कट मारला?’ अशी विचारणा करत कोयत्याने मारहाण केली. त्याच्याकडील रोकड, मोबाईल, पाकिट, आधारकार्ड जबरदस्तीने हिसकावून घेतले. यासंदर्भात फिर्याद दाखल झाल्यानंतर तपास करताना नाकाबंदीदरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार पोलिसांना पायल सर्कलजवळ सापडली. त्यामध्ये राहुल पवार, पिनेश उर्फ दिनेश उर्फ मयुर धाईजे, विवेक शिंदे, सागर बाबर हे आरोपी बसले होते. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गणेश पवार या आणखी एका साथीदाराचे नाव सांगितले. पोलिसांनी टोळीतील आरोपीची खात्री केली असता ते रेकॉडवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.