मोदी सरकार काळे कायदे करणारे सरकार ;  डॉ. रत्नाकर महाजन यांची टीका

 मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातील काळे कायदे करणारे सरकार असून ते फक्त ‘हम दो हमारे दो’ यांच्यासाठीच देशातील पैशाचा वापर करीत असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी उरुळीकांचन येथील सभेत बोलताना केली.

    उरुळी कांचन :  मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातील काळे कायदे करणारे सरकार असून ते फक्त ‘हम दो हमारे दो’ यांच्यासाठीच देशातील पैशाचा वापर करीत असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी उरुळीकांचन येथील सभेत बोलताना केली.

    कॉंग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रीय कृषी कायद्यांच्या तसेच कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात राज्यभर आंदोलन करून या भांडवलदार धार्जीन्या कायद्यांना विरोध करण्यासाठी राज्याचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या आदेशाला अनुसरून पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत ते उरुळी कांचन अशी पंधरा किलोमीटरची ट्रॅक्टर रॅली काढून ‘मोदी सरकार हाय हाय’ ‘नही चलेगी नही चलेगी मोदीकी हिटलरशाही नही चलेगी’ अशा सरकार विरोधी तर“जय जवान जय किसान’ अशी शेतकऱ्यांच्या बाजूने घोषणा देत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे आंदोलन केले. याची सांगता सभा उरुळी कांचन येथील पुणे सोलापूर रोड लगत विविध कार्यकारी सोसायटीच्या पटांगणावर झाली. या सभेत डॉ. रत्नाकर महाजन बोलत होते. या सभेला सुमारे दीडशेच्या वर ट्रॅक्टर व त्या माध्यमातून एकत्र आलेले शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे ही काही कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते. यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ, पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार संजय जगताप, माजी जिल्हा अध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य देविदास भन्साळी, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, शिरूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ गुजर तसेच १२ तालुक्यातील तालुका अध्यक्ष व ७ नगरपालिकांचे अध्यक्ष आणि महिला काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकारी प्रामुख्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होत्या.

    शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे जो पर्यंत रद्द होत नाहीत तोपर्यंत महात्मा गांधींच्या मार्गाने लढा चालूच राहणार आहे.

    -डॉ. रत्नाकर महाजन