मोदींनी पुलवामाच्या शहिदांचा राजकीय वापर केला, विकास नव्हे तर विखार हा मोदींचा अजेंडा-  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

पंतप्रधान मोदी यांच्याच अहंकारामुळे भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेली. कोरोना सुरु होण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर निच्चांकी होता. सध्याच्या घडीला भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेशपेक्षाही कमी आहे. आत्मनिर्भरतेच्या नावाखाली पंतप्रधान मोदी यांनी अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करुन त्यांची वाट लावली, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

    पुणे: पंतप्रधान मोदी यांच्या अहंकारामुळे भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचा नव्हे तर विखाराचा राष्ट्रीय अजेंडा राबवत असल्याची जळजळीत टीका काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पुण्यात पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

     ४५ वर्षात कधीही असे घडले नाही
    मोदी आणि अमित शाह यांचा कारभार दडपशाहीचा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करुन मोदींनी दंडुकेशाही राबवली. बहुमत नसताना कायदा मंजूर केला आणि हिंदू-मुस्लिम वाद उभा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलावामतील शहिदांचा राजकीय वापर केला. मात्र, गलवान खोऱ्यात २० भारतीय जवानांचा बळी जाऊनही पंतप्रधान मोदी शांत राहिले. देशाच्या गेल्या ४५ वर्षाच्या इतिहासात कधीही अशी घटना घडली नव्हती, अशी टिका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

    अहंकारामुळे भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला
    पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर चौफेर टीका केली. पंतप्रधान मोदी यांच्याच अहंकारामुळे भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेली. कोरोना सुरु होण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर निच्चांकी होता. सध्याच्या घडीला भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेशपेक्षाही कमी आहे. आत्मनिर्भरतेच्या नावाखाली पंतप्रधान मोदी यांनी अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करुन त्यांची वाट लावली, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

    साडेबारा हजार कोटी रुपयांचे रोजगार गेले
    कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी लॉकडाऊन लादताना पंतप्रधान मोदी यांनी कुठलेही नियोजन केले नव्हते. त्यामुळे अनेक स्थलांतरित कामगारांचा बळी गेला. कोरोनामुळे देशभरात साडेबारा हजार कोटी रुपयांचे रोजगार गेले. त्यांना मोदी सरकारने कुठलीही मदत दिली नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात मोदी सरकारने केवळ घोषणा केल्या. प्रत्यक्षात या सर्व घोषणा फसव्या निघाल्या. केंद्र सरकारने देशातील नागरिकांना मोफत लस देणे अपेक्षित होते. पण मोदी सरकारने लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकार आणि उद्योगपतींवर ढकलली, असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.