अखेर मान्सून पुण्यात दाखल ; पुणेकरांना मोठा दिलासा

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. राज्यात कालच मान्सून दाखल झाला.

    पुणे: उकाडा सुसाह्य झालेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनचा पाऊस अखेर पुण्यात (Pune) दाखल झाला आहे. मध्यरात्री मुंबई (Mumbai) तही मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे थोड्या का होईना मुंबईच्या वातावरणात गारवा पसरला आहे.

    मान्सूनची आगेकूच सुरु असून आज मान्सून पुण्यात दाखल झाला आहे. पुण्यातील हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी पुण्यात मान्सून दाखल झाल्याचं सांगितलं. मान्सूनची वेगाने आगेकूच सुरु असून अलिबागपर्यंत पोहोचला आहे, पुढे तो मध्य महाराष्ट्रात जाईल. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे तो वेगानं पुढे सरकत असल्याचंही कश्यपी यांनी सांगितलं.

    भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. राज्यात कालच मान्सून दाखल झाला.

    दक्षिणेकडील हवेच्या चक्रीय स्थितीमुळे मागील आठवड्यात श्रीलंकेच्या आसपास मान्सूनचा (Monsoon) वेग मंदावला होता. त्यामुळे केरळात मान्सून (Monsoon in kerala) दाखल व्हायला तीन दिवस विलंब झाला. पण त्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेग पकडला असून अवघ्या दोन दिवसांत मान्सून केरळातून महाराष्ट्रात धडकला आहे. हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजापेक्षा दोन दिवस आधीच मान्सूनने महाराष्ट्रात एन्ट्री (Monsoon arrive in Maharashtra) केली आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून टाकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. शनिवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्याच्या हर्णे याठिकाणी मान्सूनने आगमन केलं आहे. यानंतर मान्सून दक्षिण मध्य महाराष्ट्रासह सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागाला मान्सून व्यापून टाकणार असल्याची सुधारित माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.