प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

कोकणामध्ये पावसाळ्यात नेहमीच पाऊस पडत असतो. मात्र, सध्याच्या स्थितीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील चार दिवस कोकणात कोठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

    पुणे: येत्या ११ जुलैपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आतापर्यंत राज्यात शुक्रवारी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकणातील पणजी, राजापूर येथे हलका पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा आणि पन्हाळा येथे पावसाची नोंद झाली असून विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडला होता. कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला.

    गेल्या आठवड्यात (२४ ते ३० जून) कोकण, मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात असणार्‍या घाटमाथ्यासह विदर्भात मोठ्या प्रमाणावर पावसाने ओढ दिल्याने संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे ढग दाटून आले होते.

    अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, जालना, जळगाव, औरंगाबाद या ६ जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात पावसात ६० टक्क्यांहून अधिक तूट आढळून आली आहे. १४ जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी पाऊस झाला आहे. कोकणामध्ये पावसाळ्यात नेहमीच पाऊस पडत असतो. मात्र, सध्याच्या स्थितीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील चार दिवस कोकणात कोठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

    ६ व ७ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस होऊन तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

    पुढील २ आठवड्यांचा पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे त्यात पहिल्या आठवड्यात (२ ते ८ जुलै) कोकणात सरासरीपेक्षा कमी, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी ते सरासरी इतका, मराठवाड्याच्या पूर्व भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

    दुसऱ्या आठवड्यात (९ ते १५ जुलै) पावसाला सुरुवात होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भात अधिक तर पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.