सायक्लोथॉन रॅलीत १५०० हून अधिक सायकलपटू सहभागी

आपले शहर पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी सायक्लोथॉन उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांनी निरोगी जीवन जगण्यासाठी सायकलचा नियमित वापर करुन शहराला प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन महापौरांनी केले.

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२ यांच्या संयुक्त विद्यमाने आज सायकल फेरी (सायक्लोथॉन) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छ भारत – स्वस्थ भारत या अभियानाअंतर्गत इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज या केंद्र सरकारच्या कार्यक्रमांतर्गत समाजामध्ये हवा-ध्वनी प्रदुषण टाळण्याची आवश्यकता, इंधन बचती बरोबरच उत्तम आरोग्य राखण्यासाठी सायकल चालविण्याची गरज तसेच महत्व पटवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या ‘सायक्लोथॉन रॅलीस ‘ उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सायकल रॅलीत सुमारे १५०० हून अधिक सायकलपटू सहभागी झाले होते. ही सायकल फेरी (सायक्लोथॉन) सांगवी फाटा ते साई चौक (जगताप डेअरी) ते परत सांगवी फाटा या बीआरटीएस मार्गावर आयोजित करण्यात आली होती. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून या फेरीचा प्रारंभ झाला. आपले शहर पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी सायक्लोथॉन उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांनी निरोगी जीवन जगण्यासाठी सायकलचा नियमित वापर करुन शहराला प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन महापौरांनी केले.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर केशव घोळवे, आयुक्त श्रावण हर्डीकर, ३३० इन्फंट्री ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडीअर आर. सी. कटोच, ईस्टेट अधिकारी कपिल कुमार, ड प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, नगरसदस्य अंबरनाथ कांबळे, बापू काटे, आरती चौंधे, माधवी राजापुरे, पोलिस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसिकर, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले, महापालिका सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, प्रमोद ओंभासे, अनिल शिंदे, लायन्स क्लबचे प्रांतपाल लायन अभय शास्त्री आदी उपस्थित होते.

महापालिका, पोलिस दल, लष्कर आणि वाहतूक शाखेतील अधिकारी, कर्मचारी तसेच लायन्स क्लबचे सदस्य, पोलीस प्रांत मित्र संघटना, पीसीएमसी सायकलिस्ट असोसिएशन, अविरत श्रमदान, पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, फॅमिली फिजिशियन संघटना या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.

या कार्यक्रमात वेणुगोपाल राव, जय पाठक, श्रीपाद शिरोडे आणि अरूण पोटे या पुरस्कार विजेत्या सायकलपटूंचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिकेचे उपभियंता बापू गायकवाड, संजय साळी, संजय काशिद, दिपक पाटील, कनिष्ठ अभियंता अशोक कुटे, सुनील पवार, सुनील बेळगावकर आदींनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, कोरोना काळात व्यायामाचे महत्व प्रकर्षाने जाणवले. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी योगासारखे उपक्रम, पायी चालणे याबरोबरच सायकल चालविणे, विविध खेळ खेळणे अशा बाबी आपल्या दैनंदिन सवयीच्या बनविल्या पाहिजेत, असे सांगून त्यांनी महापालिकेने हरितसेतु उपक्रमाच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली आहेत. परिपूर्ण हरित विकास आराखडा तयार करण्यासाठी नागरिकांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.