१५ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांवर घरीच उपचार

कोरोना चाचण्यांचा वेग वाढविल्यानंतर कोरोनाबाधितांचा दर दिवसाला आकडा फुगत आहे. मंगळवारी (दि.२७) १ हजार ९८५ जणांना कोरोनाची बाधा झाली.तर आज झालेल्या ९१ मृत्यूमध्ये शहरातील ५३ तर महापालिका हद्दीबाहेरील ३८ जणांचा समावेश आहे. वायसीएमएच, जिजामाता, भोसरी रुग्णालयांसह कोविड केअर सेंटरमध्ये सध्या ८ हजार ५८७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर उर्वरित १५ हजार ५८ कोरोनाबाधित गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

     

    पिंपरी : पिंपरी – चिंचवड शहरात दररोज हजारो नागरिकांना कोरोना होत असून ‘मेडिकल इमर्जन्सी’ निर्माण झाली आहे. गेल्या ३९ वर्षात आरोग्य सेवेकडे करण्यात आलेले दुर्लक्ष, महापालिका रुग्णालयांमध्ये असलेला आरोग्यविषयक सुविधांचा अभाव यामुळे ही परिस्थिती उद्भवली. सद्यस्थितीत रुग्णालये कोरोना बाधितांनी तुडूंब भरली आहेत. खाटा उपलब्ध नसल्याने कित्येक घरांचे रूपांतर रुग्णालयांमध्ये झाले आहे. आज १५ हजारांपेक्षा जास्त नागरिक घरीच उपचार घेत आहेत. कोरोना संक्रमणाचा वेग अजूनही थांबण्याची चिन्हे नाहीत.

    शहरात कोरोना चाचण्यांचा वेग वाढविल्यानंतर कोरोनाबाधितांचा दर दिवसाला आकडा फुगत आहे. मंगळवारी (दि.२७) १ हजार ९८५ जणांना कोरोनाची बाधा झाली.तर आज झालेल्या ९१ मृत्यूमध्ये शहरातील ५३ तर महापालिका हद्दीबाहेरील ३८ जणांचा समावेश आहे. वायसीएमएच, जिजामाता, भोसरी रुग्णालयांसह कोविड केअर सेंटरमध्ये सध्या ८ हजार ५८७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर उर्वरित १५ हजार ५८ कोरोनाबाधित गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. मंगळवारी २ हजार ३७६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची आतापर्यंतची संख्या १ लाख ८९ हजार ६० झाली आहे. यात शहरातील १ लाख ७७ हजार ५२४ जण तर ११ हजार ५३६ जण महापालिका हद्दीबाहेरील आहेत. आजारातून बरे होण्याचे हे प्रमाण सरासरीने ८२.४२ टक्क्यांवर आले आहे. हे प्रमाण जानेवारीमध्ये ८९ टक्क्यांवर होते. गेल्या दीड महिन्यांपासून राक्षसी वेगाने वाढलेला कोरोना विषाणूंचा विळखा सैल होत नसल्याने नागरिकांच्या जिवाला घोर लागला आहे. त्यातच गेल्या २४ तासांत तपासलेल्या १९ हजार ७६३ नमुन्यांपैकी १ हजार ९८५ जण कोरोनाबाधित आढळले. पिंपरी – चिंचवडमध्ये अतिशय भयावह चित्र असून २३ हजार ६४५ कोरोनाबाधित आहेत. यातील १५ हजार ५८ कोरोनाबाधित घरी उपचार घेत असून हीच धोक्याची घंटा आहे.