खासदार बारणे यांनी घेतली पालिका आयुक्तांसोबत आढावा बैठक ; राज्य शासनाशी निगडित प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार

शहरात अनेक ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून विकासकामे केली जात आहेत. त्यातील काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कामे केली जात आहेत. ज्या-ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कामे केली जात आहेत, त्यात सुधारणा करून योग्य पद्धतीने कामे करावीत, अशा सूचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील जी कामे राज्य शासनाशी संबंधित आहेत, त्यासाठी संबंधित विभागाच्या मंत्री आणि अधिका-यांशी चर्चा करून बैठका लावणार. तसेच ती कामे पूर्णत्वास नेणार, असे आश्वासन मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले. खासदार बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत शहरातील विकासकामांबाबत ऑटो क्लस्टर येथे आढावा बैठक घेतली.

या बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहर अभियंता राजन पाटील, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, राजेंद्र पवार, प्रशांत पाटील, संजय खाबडे, श्रीमती कुंभार, ज्ञानदेव झुंझारे, अशोक देशमुख आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा खासदार बारणे यांनी आढावा घेतला. पिंपरी-चिंचवड महापालिकेची अनेक कामे राज्य शासनाकडे मंजुरी आणि अन्य बाबींसाठी पाठवण्यात आली आहेत. त्यातील बहुतांश कामे नगरविकास विभागाशी संबंधित आहेत. त्या कामांचा आढावा घेत ती कामे पूर्णत्वास नेण्यासाठी नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मंत्रालयाचे मंत्री व अधिकारी यांच्याशी बैठकीच्या माध्यामातून चर्चा करून कामे मार्गी लावण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

खासदार श्रीरंग बारणे पुढे म्हणाले, “शहरात अनेक ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून विकासकामे केली जात आहेत. त्यातील काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कामे केली जात आहेत. ज्या-ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कामे केली जात आहेत, त्यात सुधारणा करून योग्य पद्धतीने कामे करावीत, अशा सूचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. शहरातील रस्त्यांवर अतिक्रमणे वाढत आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. ही अतिक्रमणे हटवून शहराचे बकालपण दूर करावे, असेही खासदार बारणे यांनी आयुक्तांसोबतच्या बैठकीत सांगितले.

पवना नदीला पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी म्हटले जाते. मात्र, शहरातील नाल्यांचे आणि इतर दूषित पाणी पवना नदीत मिसळत आहे. त्यामुळे जीवनवाहिनी असलेली पवना नदी प्रदूषित होत आहे. पवना नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी खासदार बारणे यांनी आयुक्तांना सूचना दिल्या.