कोरोनाच्या सावटामुळे MPSC ची परीक्षा पुन्हा लांबणीवर? विद्यार्थ्यांच्या चिंतेत वाढ

यापूर्वीही कोरोना आणि लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तीन वेळा परीक्षा लांबणीवर टाकल्या होत्या. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या तिढ्यामुळे एकदा परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करत राज्यसेवा पूर्व परीक्षा १४ मार्च तर अभियांत्रिकी पूर्व परीक्षा २७ मार्च, दुय्यम अराजपत्रित पूर्व परीक्षा ११ एप्रिल रोजी घेणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. मात्र नव्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे परीक्षा पुढे तर ढकलली जाणार नाही ना? अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहे.

  पुणे: राज्यात सर्वत्र पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. वाढत्या आकडेवारीमुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागात कोरोनाबाबतचे निर्बंध अधिक कडक करण्यावर सरकार , स्थानिक प्रशासन भर देत आहे. यासगळ्यामुळे पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विदयार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे येत्या १४ मार्चला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC ) परीक्षा होणार आहे. मात्र ही परीक्षा पुढे ढकलली जाईल का काय अशी भीती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
  पुण्यात नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये कोरोनावरील निर्बंध कडक करत असतानाच शाळा महाविद्यालयांबरोबरच कोचिंग क्लासेसही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अभ्यासिका ठराविक संख्येने चालू राहतील, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षा होणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे.

  दरम्यान यापूर्वीही कोरोना आणि लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तीन वेळा परीक्षा लांबणीवर टाकल्या होत्या. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या तिढ्यामुळे एकदा परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करत राज्यसेवा पूर्व परीक्षा १४ मार्च तर अभियांत्रिकी पूर्व परीक्षा २७ मार्च, दुय्यम अराजपत्रित पूर्व परीक्षा ११ एप्रिल रोजी घेणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. मात्र नव्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे परीक्षा पुढे तर ढकलली जाणार नाही ना? अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कुठलाही निर्णय जाहीर केलेला नाही.

  सरकारने आधीच वयोमर्यादा व अटेम्प्टची संख्या मर्यादित केली आहे. त्यातही यावेळी परीक्षेची झाली नाही तर विद्यार्थ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होईल

  - अमोल बडे, विद्यार्थी

  ”गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा रद्द झाली. काही दिवसांपासून पुण्यात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे यावर्षीही परीक्षा होईल, की नाही असे प्रश्नचिन्ह आमच्यासमोर उभे आहे. जर यावर्षीही परीक्षा झाली नाही तर आमचे २ वर्षे वाया जातील’

  – शुभम पाटील,विद्यार्थी