महावितरण देणार कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना पगारी रजा

कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय व आर्थिक सहायता करणारे विविध निर्णय महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी घेतले आहेत. यामध्ये कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना उपचाराच्या तसेच विलगीकरणाच्या कालावधीची पगारी रजा मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महावितरण कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    पिंपरी : कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय व आर्थिक सहायता करणारे विविध निर्णय महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी घेतले आहेत. यामध्ये कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना उपचाराच्या तसेच विलगीकरणाच्या कालावधीची पगारी रजा मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महावितरण कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    कोरोनाचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. त्यापासून महावितरण कंपनीदेखील वाचु शकलेली नाही. वीजपुरवठ्याचा आवश्यक सेवेत समावेश होत असतानादेखील महावितरण कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळालेला नाही. खंडीत वीजपुरवठा सुरळीत करणे, पावसाळ्यापुर्वीच्या देखभाल – दुरुस्तीची कामे करणे, ग्राहकांचे मीटर रिडिंग घेणे अशी अनेक कामे महावितरणचे कर्मचारी कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही करत आहेत.

    हे काम करताना अनेक कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून, काहींनी प्राणदेखील गमावले आहेत. फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळावा यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांना काम बंद आंदोलन देखील केले होते. याची दखल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना घ्यावी लागली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांची नाराजी दुर करण्यासाठी फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात आली.

    या चर्चेनुसार कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या उपचाराचा किंवा विलगीकरणाचा कालावधी हा कर्तव्य कालावधी समजून पगारी रजा मंजूर करण्यात आली आहे. वेतनश्रेणी तीन व चारमधील सर्व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर किट खरेदीसाठी एकवेळा एक हजार रुपये विशेष बाब म्हणून देण्यात येणार आहे. कोरोनामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना अग्रीम म्हणून ५० हजार रुपये आणि घरी किंवा संस्थात्मक कक्षात विलगीकरणात उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये अग्रीम मंजूर करण्यात आला आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य तसेच विम्याचे २० लाख असे एकूण ५० लाख रुपयांची मदत करण्यात येत आहे. यामध्ये महावितरणच्या सर्व नियमित (प्रशिक्षणार्थी व सहायक यांच्यासह) व बाह्यस्त्रोत कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या वारसांचा समावेश आहे.

    हे सुद्धा वाचा