प्रवाशांची लाडकी ‘लालपरी’ आर्थिक संकटात

महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांची सेवा करणारी किफायतशीर आणि सुरक्षित समजली जाणारी 'लालपरी' अर्थात एसटीला नुकतेच ७३ वर्ष पूर्ण झाले. सर्वांची लाडकी असणारी लालपरी आता मात्र आर्थिक संकटात सापडली.

  रांजणी / रमेश जाधव : महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांची सेवा करणारी किफायतशीर आणि सुरक्षित समजली जाणारी ‘लालपरी’ अर्थात एसटीला नुकतेच ७३ वर्ष पूर्ण झाले. सर्वांची लाडकी असणारी लालपरी आता मात्र आर्थिक संकटात सापडली असून, दिवसेंदिवस हे संकट वाढत असल्याचे दिसत आहे. दिवस-रात्र प्रवाशांची सेवा करणारी आणि ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’  हे ब्रीद अभिमानाने मिरवणारी एसटी आता खाजगी करण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.

  महामंडळाचे आर्थिक बजेट कोलमडले

  एसटी महामंडळ तोट्यात जाण्यामागे सरकारची उदासीनता आणि ध्येय धोरणे कारणीभूत असून, खाजगी करणात स्वारस्य असल्याने त्याकडे दुर्लक्ष होत आहे का?, हा खरा प्रश्न आहे. मागच्या सरकारपासून एसटी महामंडळाचे अध्यक्षपद परिवहन मंत्र्याकडेच असूनही त्यावर काहीही भरीव कामगिरी केल्याचे दिसत नाही. एसटीला दिशा देण्यासाठी संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक त्याचप्रमाणे उच्चपदस्थ अधिकारी यांनी काहीही पावले उचलली नसल्याने घटत चाललेले उत्पन्न व ज्यांच्याकडून येणे बाकी आहे. त्यांची वसुली ही होत नसल्याने गेले दीड वर्षापासून एसटी महामंडळाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

  कामगार संघटनांची मुस्कटदाबी ?

  कर्मचाऱ्यांचे जुलै ऑगस्ट महिन्याचे वेतन रखडले असून, कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा देऊन औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे. खाजगीकरणाच्या उंबरठ्यावर असलेले एसटी महामंडळ हे नक्की कुणाचे खिसे भरण्यासाठी सरकार पाऊल उचलत आहे, हे कळायला मार्ग नाही. शिवाय एसटी प्रवाशांच्या आणि कामगारांच्या मुद्द्यावर आक्रमक होणाऱ्या विविध संघटनाही हतबल झाल्याचे किंवा त्यांची मुस्कटदाबी करण्यात आली आहे काय, हे ही  कळायला मार्ग नाही.

  प्रवाशांच्या सूचनांचा विचार व्हावा

  खरं तर खाजगी प्रवासी वाहतुकीचा विचार करुन त्या दृष्टीने महामंडळाने वेळीच काही उपाययोजना करायला पाहिजे होत्या. खाजगी प्रवासी वाहतूक जलद आणि आरामदायी असल्याने प्रवासी अशा वाहतुकीला पसंती देतात, तर कालबाह्य ठरलेल्या आणि धडधड आवाज करणाऱ्या तसेच  देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता अभाव अशा काही कारणामुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. याशिवाय शिवनेरी, स्लीपर कोच या गाड्या आरामदायी असल्यातरी त्या ठराविक मार्गावरच धावत असून, त्यांचे भाडे कितीतरी पटीने जास्त आहे. एसटीचे उत्पन्न वाढविण्याच्या संदर्भात आणि सेवेच्या  संदर्भात सर्वसामान्य प्रवाशांची आणि संघटनांची मते जाणून घेऊन त्यांच्या तक्रारी आणि मार्गदर्शक सूचनांचाही विचार करायला हवा होता.

  ग्रामीणमध्ये बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय चुकीचा  

  महाराष्ट्रातील इतर महामंडळा प्रमाणेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ( एसटी )  आर्थिक तोट्यात सापडले असून महामंडळाला दहा हजार कोटी रुपयांहून अधिक तोटा झाला असल्याचे सांगितले जाते.  कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून एसटी वाहतूक बंद करण्यात आली होती,  दरम्यान आता प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या पूर्ण क्षमतेने चालू करण्यात आल्या असून ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात एसटी प्रवासी वाहतूक अजुनही बंद ठेवण्याचा निर्णय सर्वस्वी चुकीचा ठरला आहे. ग्रामीण भागात प्रवासाची पर्यायी व्यवस्था नसताना एसटी  बंद ठेवल्यामुळे हे उत्पन्न बंद झाल्यामुळेही महामंडळाला आर्थिक हानी सोसावी लागल्याचे चित्र आहे.