मुखईची पलांडे आश्रमशाळा ऑनलाईन सुरु

शिक्रापूर : मुखई (ता. शिरूर) येथील कै. रा. गे. पलांडे माध्य आश्रमशाळा व कनिष्ठ महाविदयालय या शाळेमध्ये नेहमी वेगवेगळे उपक्रम राबविले जात असताना आता नव्याने ऑनलाईन होम स्कूल या संकल्पनेतून शाळा

शिक्रापूर  : मुखई (ता. शिरूर) येथील कै. रा. गे. पलांडे माध्य आश्रमशाळा व कनिष्ठ महाविदयालय या शाळेमध्ये नेहमी वेगवेगळे उपक्रम राबविले जात असताना आता नव्याने ऑनलाईन होम स्कूल या संकल्पनेतून शाळा बंद मात्र शिक्षण चालू या शासनाच्या धोरणा नुसार १५ जून पासून ऑनलाईन शाळा सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाठ यांनी दिली आहे.
देशभरात कोरोना महामारीच्या संकटामुळे १६ मार्च २०२० पासून आजपर्यत सर्व शाळा बंद आहेत. त्या कधी सुरू होतील याबाबत काहीही समजू शकत नसून पुढची परिस्थीती कशी राहील त्यावर ते अवलंबून आहे, महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमातीच्या ९७६ प्राथ. माध्य. उच्च माध्यमिक आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या लमाण, भराडी, डोंबारी, बेलदार, रामोशी, धनगर, वंजारी, पारधी, लोहार, जोशी, नंदीवाले अशा अनेक विमुक्त जाती जमातीच्या ३ लाख १५ हजार मुलांच्या शैक्षणिक भविष्याचे काय हा चर्चेचा विषय झाला असताना आज ही मुलं आपापल्या गावी घरी असल्यामुळे सर्व मुले शाळा बाध्य होण्याच्या मार्गावर आहेत. सर्व मुलांच्या पालकांच्या समोर आमच्या मुलाचे शिक्षणाचे काय? हा मोठा प्रश्न आहे. राज्यातील सर्वच आश्रमशाळेतील मुलांच्या समोर अंधार दिसत आहे. या गोरगरीब वंचीत मुलांना सध्याच्या कोरोणा महामारीच्या काळामध्ये शिक्षण प्रवाहातून बाहेर जाऊ दयायचे नसेल व त्यांना शिक्षण प्रवाहात ठेवायचे असेल तर शासन, संस्थाचालक, आणि मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन काही काळानुरूप पावलं उचलणे गरजेचे असताना विदयार्थ्यांचे हीत व स्वतःची कर्तव्य जबाबदारी लक्षात घेत १५ जून पासून ऑनलाईन शाळा सुरू करण्यासाठी मुखई येथील काळभैरव शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या अध्यक्षा जयश्री पलांडे व कार्याध्यक्ष अॅड. अशोकराव पलांडे यांच्या प्रेरणेनेतून शाळेने सर्व शिक्षकांशी विचार विनिमय करून त्याप्रमाणे ऑनलाईन  शाळा कशी सुरू करता येईल यासाठी एक कृती आराखडा तयार केला असून त्यामाध्यमातून सर्व मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार शाळेमध्ये शिक्षण सर्व मुलांना ऑनलाईन पद्धतीने एकत्र करून त्यांना समोरील शुटींगच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, त्यामुळे मुलांना शिक्षण घेता येत असून मुलांचे शिक्षण देखील बुडत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.