कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी वॉर्ड स्तरावर महापालिकेचे मायक्रो नियोजन : महापौर उषा उर्फ माई ढोरे

सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक (रुग्णालये व दवाखाने) यांनी कोविड संशयित रुग्णांची (Suspect Case) व कोविड बाधित रुग्णाची माहिती महापालिकेला देणे बंधनकारक राहील. ‘मी जबाबदार’ ऍप मध्ये सदर रुग्णांची नोंद करणे बंधनकारक राहील. सदरचा Login ID/ Password पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून देण्यात येईल. कोविड बाधित किंवा लक्षणे असणा-या संशयित रुग्णास खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी गृहविलगीकरण न करता संस्थात्मक विलगीकरण (Institutional Quarantine)करणे बंधनकारक राहील.

  पिंपरी:  कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिका वॉर्ड स्तरावर मायक्रो नियोजन करण्यात आल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली. महापालिका वॉर्ड स्तरावर संस्थात्मक विलगीकरण कक्ष, कोरोना टेस्टींग सेंटर, फिव्हर क्लिनिक, क्षेत्रीय स्तरावर सुसज्ज वॉर रुम उभारण्यात येणार आहेत, याबाबत प्रशासकीय स्तरावर आदेश ही निर्गमित करण्यात आले आहेत.

  याबाबत सविस्तर माहिती देताना महापौर माई ढोरे म्हणाल्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कोरोना विषाणूचा परिरोध (प्रतिबंध) करुन वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिका स्तरावर युध्दपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. COVID-१९ चा प्रादुर्भाव/संक्रमण रोखण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी कोरोना आजाराच्या साथीचा प्रतिबंध/उपायोजना करण्यासाठी यापुर्वीच्या दोन लाटांचा पुर्वानुभव विचारात घेता यापुढील नजीकच्या काळात तिस-या लाटेचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेवून उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी, प्रत्येक क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत असलेल्या ४ वॉर्डमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०४ “कोविड दक्षता समित्या” (CVC) स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये स्थानिक नगरसदस्य, क्षेत्रीय अधिकारी, संबधित रुग्णालय प्रमुख किंवा वैद्यकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, त्याभागातील NGO व व्यापारी संघटनेचा प्रतिनिधी यांचा समावेश राहील. समितीमध्ये किमान ०५ व कमाल १० सदस्य असतील. याप्रमाणे ३२ प्रभागाकरीता ३२ “कोविड दक्षता समित्या” स्थापन केल्या जातील. समितीमार्फत क्षेत्रीय स्तरावर सुसज्ज वॉर रुम निर्माण करुन क्षेत्रीय स्तरावरील ४ समित्यांचे संचालन, नियंत्रण क्षेत्रीय अधिकारी स्तरावर करण्यात येईल.

  महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये व मोठया निवासी सोसायटयांचे क्लब हाउस/इतर हॉल मध्ये वॉर्ड कोविड सेंटर (WCC) स्थापन करण्यात येणार आहे. महापालिकेच्या ३२ वॉर्डमध्ये स्वतंत्रपणे प्रत्येकी ०१ याप्रमाणे ३२ वॉर्ड कोविड सेंटर (WCC) स्थापन होतील. वॉर्ड कोविड सेंटरमध्ये किमान ५० बेडची व्यवस्था राहील.• सदर जागेजवळ स्वतंत्रपणे Fever OPD स्थापन करुन संशयित रुग्णांची तपासणी करण्यात यावी. तसेच RAT/RTPCR तपासणी केली जाईल. शहरातील सर्व मोठ्या निवासी सोसायट्यांमध्ये (अंदाजे १०० घरे किंवा ५०० लोकसंख्येपेक्षा जास्त) त्यांच्या मालकीच्या क्लबहाऊस मध्ये/इतर हॉलमध्ये विलगीकरण केंद्र निर्माण करण्यासाठी संबंधित क्षेत्रीय अधिकारी कार्यवाही करतील. जेणेकरुन सदर सोसायटीतील कोविड संशयित व बाधित रुग्ण सोसायटीच्या क्लब हाउस/इतर हॉल मध्ये दाखल करता येतील.

  महापालिका कार्यक्षेत्रातील कोविड बाधित रुग्णांना गृह विलगीकरण न करता सर्व रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर दिला जाईल. संस्थात्मक विलगीकरण करतांना संबंधित रुग्ण राहत असलेल्या निवासी सोसायट्यांमध्ये त्यांच्या मालकीच्या क्लबहाऊस /इतर हॉल मध्ये असलेल्या विलगीकरण केंद्रामध्ये दाखल केले जाईल. महापालिकेच्या वॉर्डस्तरीय स्थापन केलेल्या ३२ वॉर्ड कोविड सेंटरमध्ये दाखल करणे, रुग्णाने स्वेच्छेने खाजगी हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या हॉटेलमधील कोविड केअर सेंटर मध्ये दाखल होणेस अनुमती मागितल्यास परवानगी देणे, महापालिका स्तरावर स्थापन केलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करणे, अपवादात्मक परिस्थितीमध्ये उदा. गरोदर माता, दिव्यांग व्यक्ती, बेडरिडन व्यक्ती, लहान मुलांची देखभाल करणारा दुसरे कोणी नसणारा एकमेव पालक इत्यादी यांना वैद्यकीय अधिका-यांकडून तपासणी करुन गृहविलगीकरणाची परवानगी देणे असे पर्याय दिले जातील.

  सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक (रुग्णालये व दवाखाने) यांनी कोविड संशयित रुग्णांची (Suspect Case) व कोविड बाधित रुग्णाची माहिती महापालिकेला देणे बंधनकारक राहील. ‘मी जबाबदार’ ऍप मध्ये सदर रुग्णांची नोंद करणे बंधनकारक राहील. सदरचा Login ID/ Password पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून देण्यात येईल. कोविड बाधित किंवा लक्षणे असणा-या संशयित रुग्णास खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी गृहविलगीकरण न करता संस्थात्मक विलगीकरण (Institutional Quarantine)करणे बंधनकारक राहील. याबाबत खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी संबंधित क्षेत्रातील महापालिकेच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिका-यांशी समन्वय ठेवून सदर रुग्ण गृहविलगीकरण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि त्यांना वॉर्ड कोविड सेंटर(WCC) कडे पाठविले जाईल.

  यापूर्वी खासगी रुग्णालयांमार्फत कोरोना बाधित रुग्णांना अवास्तव बिले आकारणी करणे अथवा बिलासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने अशा बिलांचे पडताळणी समिती मार्फत पूर्व लेखा परिक्षण करून शासन नियमाप्रमाणे बिलांची आकारणी केली असल्याची खात्री करूनच अंतिम बील निश्चीत केले जातील. यामुळे अवाजवी बील आकारणीवर ‍नियंत्रण येईल आणि त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे, असेही महापौर माई ढोरे यांनी सांगितले.