विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी महापालिकेने आराखडा तयार करावा; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी जे काम करणे आवश्यक आहे ते महापालिकेने करावे. योजनांचा प्रसार, प्रचार करावा. नागरिकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. कोरोना काळात केंद्र सरकारने अतिशय तुटपुंजी मदत केली.

  पिंपरी: कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेने आराखडा तयार करावा. आर्थिक सहायतेबरोबरच कायदेशीर सहायही करावे. वेळप्रसंगी पोलिसांचीही मदत घेऊन एकल विधवा महिलांना संरक्षण कवच द्यावे, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले. १ ते ९ सप्टेंबर दरम्यान विशेष मोहिम राबवून बांधकाम कामगार, माथाडी कामगार, घरेलू कामगार यांची नोंदणी करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

  कोरोना महामारीच्या काळात पिंपरी – चिंचवड महापालिकेने केलेल्या नाविन्यपूर्ण कामगिरीचा आढावा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतला. कोरोना कालावधीत शासनाने जाहीर केलेल्या माथाडी कामगार, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, रिक्षा चालक, एकल महिला, निराधार मुले यांच्याकरीता असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत महापालिकेने केलेल्या कामकाजाचा देखील त्यांनी आढावा घेतला. महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, शिवसेना नगरसेवक अ‍ॅड. सचिन भोसले, नगरसेविका मीनल यादव, अश्विनी वाघमारे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर आदी उपस्थित होते. आयुक्त राजेश पाटील यांनी पिंपरी – चिंचवड महापालिकेतील विविध कामकाजाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

  कोरोनामुक्त गाव या उपक्रमाप्रमाणे सर्वांच्या सहकार्याने ‘कोरोनामुक्त वार्ड’ करण्याच्या सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आयुक्तांना दिल्या. १ ते ९ सप्टेंबर या कालावधीत बांधकाम, घरेलू तसेच वेगवेगळ्या कामात कार्यरत कामगारांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवा. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी प्रयत्न करावेत. संजय गांधी निराधार योजनांबाबत प्रलंबित विषय गतीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विषयांचा पाठपुरावा करुन त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी प्रयत्न करावा. कोविडमुळे निराधार महिलांच्या पुनर्वसनासाठी एक उपसमिती स्थापन करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

  पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, कोरोनामुळे २२०० महिला विधवा झाल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. कोरोनामुळे विधवा झालेल्या एकल महिलांचे पुर्नवसन, कौशल्य विकास करण्यावर भर द्यावा. निराधार झालेल्या महिलांच्या मुलांवर बालमजुरी, बालविवाहाची वेळ ओढावू नये, यासाठी प्रयत्न करावेत. महिलांना कोणती मदत हवी आहे, त्याचा अभ्यास करुन मदतीसाठी ‘टास्ट फोर्स’ बरोबरच महापालिकेने उपसमितीची स्थापना करावी. एकल महिलांच्या पुर्नवसनासाठी सामाजिक संस्थेच्या मदतीने आराखडा तयार करावा. राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी जे काम करणे आवश्यक आहे ते महापालिकेने करावे. योजनांचा प्रसार, प्रचार करावा. नागरिकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. कोरोना काळात केंद्र सरकारने अतिशय तुटपुंजी मदत केली. ‘पीएम स्वनिधी’ शिवाय महापालिकेला केंद्र सरकारकडून कोणताही निधी आला नाही. असंघटित क्षेत्रातील लोकांना मदत करणे गरजेचे आहे. पण, केंद्र सरकारने काहीच मदत केली नसल्याची खंत गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

  भाजपने स्थायी सभापतींना राजीनामा द्यायला सांगावे

  भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे सहकारी भ्रष्टाचाराविरोधात बोलत असतात. परंतु, भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतींना लाच प्रकरणात ‘एसीबी’ने अटक केली. याबाबत भाजपने योग्य भूमिका घेऊन स्थायी समिती सभापतींना राजीनामा द्यायला सांगायला पाहिजे, असे स्पष्ट मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.