महानगरपालिका नेमबाजी प्रशिक्षण केंद्रांसाठी ३१ लाखाचे साहित्य देणार

या साहित्याच्या बदल्यात नेमबाजी प्रशिक्षण केंद्रामार्फत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. खेळाडुंसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्राला सीयुस मशिनच्या पाच नग देण्यात येणार आहे. या अटींवर साहित्य संबंधित संस्थेस तातडीने पुरविण्यात येणार आहे.

    पिंपरी: आकुर्डी येथील आचिव्हर रायफल आणि पिस्तुल शुटींग क्लब या नेमबाजी प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंसाठी ३१ लाखाचे साहित्य पिंपरी – चिंचवड महापालिकेमार्फत देण्यात येणार आहे. त्या बदल्यात या संस्थेमार्फत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. महाराष्ट्र रायफल असोसिएशन अंतर्गत नुकतीच राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत आकुर्डीतील आचिव्हर रायफल आणि पिस्तुल शुटींग क्लब या नेमबाजी प्रशिक्षण केंद्रातील आणि पिंपरी – चिंचवड मधील तब्बल १२ नेमबाजांची पूर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामध्ये अक्षत घुबे हा नेमबाज राज्यात पहिला आला. त्याने व इतर ११ खेळाडूंनी पिंपरी – चिंचवडचा नेमबाजीत राज्य पातळीवर लौकीक केला आहे. या पूर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या नेमबाजांची स्पर्धा एप्रिल महिन्यात आहे. त्यामुळे त्यांना सराव करण्यासाठी अत्याधुनिक साहित्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन या खेळाडुंसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्राला सीयुस मशिनच्या पाच नग देण्यात येणार आहे. या एका नगाची किंमत अंदाजे २ लाख ७० हजार रूपये आहे. तसेच पिस्तुल (मोरणी) पाच नग देण्यात येणार आहेत. त्याची प्रति नग किंमत दोन लाख रूपये आहे. तसेच रायफल (वॉलथेर) तीन नग देण्यात येणार आहेत. त्याची प्रति नग किंमत अंदाजे २ लाख ५० हजार रूपये आहे. या सर्व साहित्य खरदीसाठी ३१ लाख रूपये खर्च होणार आहे. या साहित्याच्या बदल्यात नेमबाजी प्रशिक्षण केंद्रामार्फत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अटींवर साहित्य संबंधित संस्थेस तातडीने पुरविण्यात येणार आहे.