कोरोना प्रतिबंधक लस उत्पादनासाठी महापालिका ‘एचए’ला २५ कोटी देणार

हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी व्यवस्थापनाने केंद्र सरकारकडे कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीबाबत परवानगी मिळावी, असा प्रस्ताव पाठवला आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्यासाठी आवश्यक निधी पिंपरी - चिंचवड महापालिकेने द्यावा अशी मागणी करण्यात आली होती

    पिंपरी: पिंपरीस्थित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीला कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी पंचवीस कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचा ठराव महासभेने एकमताने मान्य केला. पिंपरी – चिंचवड महापालिका परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेत अत्यंत अल्प प्रमाणात लसीचा पुरवठा होत आहे. परिणामी, शहरातील अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे. दरम्यान, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी व्यवस्थापनाने केंद्र सरकारकडे कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीबाबत परवानगी मिळावी, असा प्रस्ताव पाठवला आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्यासाठी आवश्यक निधी पिंपरी – चिंचवड महापालिकेने द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. यावर महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘एचए’ कंपनीबाबत करार करणे आणि महापालिकेस लस पुरवठा करून घेण्याबाबत सर्वाधिकार महापालिक आयुक्तांना बहाल करण्यात आले आहेत.