महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले! द्विसदस्यीय प्रभागाकडे कल

या पद्धतीचा फायदा विशेष करून मुंबईत शिवसेनेला होणार आहे. परंतु एक सदस्यीय प्रभाग पद्धतीत पैशांची ताकद चालते. त्यातून अपक्ष नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून येतात. त्यानंतर सत्ता स्थापन होत असताना मोठा घोडेबाजार होतो, असा सर्वसाधारण अनुभव आहे.

  पिंपरी: राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार वॉर्डरचना तयार करण्याच्या सूचना दिल्याने महापालिका निवडणुकीसाठी देखील एक सदस्यीय प्रभाग रचना लागू होईल, असे सांगितले जात आहे. परंतु निवडणूक आयोगाने गुगल मॅपवर फक्त प्रगणक गटाच्या मार्किंगच्या सूचना दिल्याने एकसदस्यीय की द्विसदस्यीय याबाबतचा ठोस निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेसमध्ये प्रभाग रचनेवरून गहन मंथन – चिंतन सुरू असल्याचे बोलले जात आहे. दोन सदस्यांचा प्रभाग महापालिका निवडणुकीत लागू होणार असल्याचे ठामपणे मानले जात आहे.

  …असा आहे प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा

  डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२, या कालावधीत मुदत संपुष्टात येणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला. कच्च्या आराखड्यात २०११ ची लोकसंख्या विचारात घेऊन प्रभाग रचना तयार करावी, हद्दींमध्ये भौगोलिक बदल झाला असल्यास ते क्षेत्र निश्चित करावे, आराखडा गोपनीयरीत्या तयार करावा, आराखडा तयार करताना मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करावी, न्यायालयाचे आदेश विचारात घ्यावेत, आरक्षण सोडत जाहीर होईपर्यंत गोपनीयता ठेवावी, ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या प्रभागरचनेला निवडणूक आयुक्त, ‘ब’ व ‘क’ वर्ग नगरपालिकांच्या प्रभागरचनेला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्त मान्यता देणार आहेत.

  प्रभागांचा प्रारूप आराखडा

  अनेक महिन्यांपासून प्रभागरचना एक सदस्यांची होईल की द्विसदस्यीय, यावरून चर्चा सुरू आहे. नगरपालिकांसाठी एक सदस्यीय रचनेनुसार प्रभागरचना करण्याच्या सूचना देण्यात आल्याने पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांमध्येही एक सदस्यीय प्रभागरचना लागू होईल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु निवडणूक आयोगाने नियमानुसार मुदत संपत असलेल्या नगरपालिकांसाठी प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वास्तविक, सूचना देताना निवडणूक आयोगानेदेखील ठोस असा निर्णय घेतलेला नाही. तयारीचा भाग म्हणून गुगल मॅपवर फक्त प्रगणक गटाचे मार्किंग करण्याच्या सूचना दिल्या. वास्तविक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये द्विसदस्यीय प्रभाग असावा, अशी मागणी राजकीय पक्षांकडून होत आहे.

  आग्रह द्विसदस्यीय प्रभागाचा

  नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्य शासनाने बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करून एक सदस्यीय प्रभागरचनेचा कायदा पारित केला आहे. या पद्धतीचा फायदा विशेष करून मुंबईत शिवसेनेला होणार आहे. परंतु एक सदस्यीय प्रभाग पद्धतीत पैशांची ताकद चालते. त्यातून अपक्ष नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून येतात. त्यानंतर सत्ता स्थापन होत असताना मोठा घोडेबाजार होतो, असा सर्वसाधारण अनुभव आहे. शिवाय पन्नास टक्के महिला आरक्षण असल्याने मातब्बर पुरुषांच्या हक्काच्या जागेवर महिला आरक्षण पडल्यास एक तर घरातील महिलांना निवडणुकीत उतरावे लागेल किंवा मतदारसंघ सोडून अन्य भागातून निवडणूक लढवावी लागेल, अशी भीती आहे. त्यामुळे द्विसदस्यीय प्रभागरचनेचा आग्रह आहे.