महापालिका अधिकारी- कर्मचाऱ्यांनी भयमुक्त राहून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजवावे: आयुक्त

शहरातील काही लसीकरण केंद्रे नियमित चालू राहतील असे नियोजन केले जाणार आहे. लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा आणि त्याठिकाणी प्रतिक्षेसाठी लागणारा कालावधीचा विचार करता यामध्ये सुसुत्रता येणे आवश्यक आहे. यासाठी येत्या काही दिवसात किऑस्कद्वारे टोकन देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

    पिंपरी: शहराचा स्मार्ट लुक करण्यासाठी आणि महापालिकेची जनमाणसातील प्रतिमा उंचावण्यासाठी महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी भयमुक्त राहून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजवावे असे प्रतिपादन आयुक्त राजेश पाटील यांनी केले. दुसऱ्या टप्प्यातील प्रभाग स्तरावरील आढावा बैठकांना सुरुवात झाली, महापालिकेच्या नेहरुनगर येथील क क्षेत्रीय कार्यालयास आयुक्त राजेश पाटील यांनी भेट देऊन प्रभाग क्र. ८ आणि ९ मधील कामे तसेच विविध उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली.

    इंद्रायणीनगर भागातील आरक्षणे विकसित करावी, प्रभागातील अर्धवट कामे पूर्ण करावीत, नागरिकांचा वावर असणारे रस्ते तयार करावेत, पीएमआरडीए आणि महापालिका यांच्या अधिकार कक्षेची माहिती द्यावी, स्विमींग पुल बांधण्यात यावा, फुटपाथ दुरुस्त करावे, अनधिकृत टपऱ्या आणि होर्डींग्जवर कारवाई करावी. ऑफलाईन लसीकरण नोंदणीवर अधिक भर द्यावा, सोसायटी तसेच झोपडपट्टी तथा चाळ परिसरात लसीकरण केंद्र कार्यान्वित करावे, अण्णासाहेब मगर स्टेडीयम आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे विकसित करावे, लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करावे, प्रभागातील ठराविक लसीकरण केंद्रे कायमस्वरुपी सुरु ठेवावे, ऑक्सीजन पार्क तयार करावा, फुटपाथवरील अतिक्रमण हटवावे, एचए मैदानावरील अनधिकृत झोपड्यांबाबत निर्णय घ्यावा, चौक आणि रस्त्यांचे सुशोभिकरण करावे, विविध उद्यानांची कामे, जलनि:सारणची कामे करावी अशा सूचना नगरसदस्यांनी यावेळी मांडल्या.

    बैठकीत आलेल्या सूचना आणि मुद्दयांबाबत तसेच पूर्ण झालेले, चालू असलेले आणि भविष्यात हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या कामांबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. आयुक्त राजेश पाटील म्हणाले, शहरातील काही लसीकरण केंद्रे नियमित चालू राहतील असे नियोजन केले जाणार आहे. लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा आणि त्याठिकाणी प्रतिक्षेसाठी लागणारा कालावधीचा विचार करता यामध्ये सुसुत्रता येणे आवश्यक आहे. यासाठी येत्या काही दिवसात किऑस्कद्वारे टोकन देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या टोकन धारकांना लसीकरण कधी होईल याची माहिती दिली जाईल. लसीकरणासाठी पथक आणि केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार असून लसीचा पुरवठा विचारात घेऊन त्याप्रमाणे नियोजन केले जाईल. शहरातील मोठ्या रस्त्यांचे सुशोभिकरण करताना आकर्षक वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे. हॉकर्सचे नियोजन करण्यात येणार असून अतिक्रमणांवर कारवाईदेखील केली जाईल. पुढील ५ वर्षात शहरातील प्रत्येक स्ट्रीट स्मार्ट करण्याचा मानस असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. तर रेड झोनला हरीत पट्ट्यामध्ये परावर्तीत करण्यासाठी वृक्षारोपण केले जाणार आहे असेही त्यांनी सांगितले.

    प्रभाग स्तरावरील समस्या, अतिक्रमण तसेच हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, कोरोना विषयक नियोजन अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीस नगरसदस्या सीमा सावळे, डॉ. वैशाली घोडेकर, नम्रता लोंढे, नगरसदस्य विलास मडीगेरी, समीर मासुळकर, राहुल भोसले, विक्रांत लांडगे, स्वीकृत सदस्या वैशाली खाड्ये, क क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, नितीन देशमुख, संजय भोसले, संजय घुबे, रामनाथ टकले, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ. करुणा साबळे आदींसह स्थापत्य, विद्युत, स्थापत्य क्रीडा, पाणीपुरवठा, बांधकाम परवानगी, नगररचना, स्थापत्य उद्यान, झोनिपु स्थापत्य, आरोग्य, जलनि:सारण, अतिक्रमण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.