मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार आता अभ्यासक्रमासह मोफत टॅब: ॲड. नितीन लांडगे

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत खंड पडू नये, तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत शिकत असणा-या पहिले ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मनपाच्या वतीने शालेय अभ्यासक्रमांच्या सॉफ्टवेअरसह एक टॅब देण्याबाबतचा विषय बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला.

    पिंपरी: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पिंपरी चिंचवड शहरात तसेच राज्यातील काही भागात पुर्णता किंवा अंशता लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील मनपा शाळांसह सर्वच शाळा मागील शैक्षणिक वर्षात ऑनलाईन पध्दतीने सुरु होत्या. चालू शैक्षणिक वर्षात देखिल तीसरी कोरोनाची लाट येण्याची शक्यता गृहीत धरुन अद्यापपर्यंत सर्व शाळा ऑनलाईन पध्दतीने सुरु आहेत.

    मनपा शाळेत शिकत असणारे बहुतांशी विद्यार्थी हे झोपडपट्टी परिसरातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात. त्यांच्या पालकांची स्मार्टफोन घेण्याइतपत आर्थिक क्षमता नसते. याबाबत अनेक पालकांनी तक्रारी केल्या होत्या. या अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता आहे. पालकांची हि अडचण दूर करुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत खंड पडू नये, तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत शिकत असणा-या पहिले ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मनपाच्या वतीने शालेय अभ्यासक्रमांच्या सॉफ्टवेअरसह एक टॅब देण्याबाबतचा विषय बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. राज्य शासनाने मंजूर केलेल्या शालेय अभ्यासक्रमावर आधारीत स्पॉटवेअर ई-लर्निंग साहित्यासह हा टॅब देण्यात येईल. ज्या संस्थांनी जिल्हा परिषद, शिक्षण संस्था, इतर महापालिका व स्मार्ट सिटीला शालेय अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर पुरविले आहे अशा बालभारतीने मंजूर केलेल्या नामांकित संस्थेकडून पहिले ते दहावी शैक्षणिक अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर (ई-लर्निंग साहित्यासह) घेण्यास मान्यता देण्यात आली. स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मांडण्यात आलेल्या या ठरावास सर्व सदस्यांनी मंजूरी दिली अशी माहिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.