वाहन भत्ता मिळत असताना महापालिकेचे वाहन वापरणारे अधिकारी रडारवर

-संबधित अधिकार्‍यांकडून वसुलीचे पुणे महापालिका प्रशासनाचे आदेश

    पुणे : वर्षानुवर्षे महापालिकेचेच वाहन वापरत असताना वेतनातही स्वतंत्र वाहन भत्ता घेणार्‍या ‘अधिकार्‍यांवर’ गडांतर आले आहे.  प्रशासनाने महापालिकेचे वाहन वापरत असताना वेतनातही स्वतंत्र वाहन भत्ता घेणार्‍या अधिकार्‍यांना दोन्ही पैकी एकच सुविधा देण्याचे आदेश देतानाच यापुर्वी हे दोन्ही लाभ घेणार्‍या अधिकार्‍यांकडून तात्काळ वसुली सुरू करावी, असे आदेश दिल्याने अधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

    अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज यासंदर्भात आदेश दिले आहेत. महापालिकेच्या २०१६ मधील वाहन धोरणानुसार अधिकारी व कर्मचार्‍यांना फिरतीच्या कामासाठी वाहन भत्ता दिला जातो. ज्यांना वेतनामध्ये वाहन भत्ता दिला जात आहे, त्यांना महापालिकेचे वाहन वापरता येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद आहे. परंतू यानंतरही अनेक अधिकारी विशेषत: सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता या पदावरील अधिकारी वाहन भत्ता घेत असतानाच महापालिकेचे वाहन देखिल वापरत असल्याचे समोर आले आहे. याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
    रुबल अग्रवाल यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, मोटार वाहन विभागाचे उपायुक्त तसेच सर्व खातेप्रमुखांना यासंदर्भातील माहिती ही माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे पाठविण्यात यावी. त्यानुसार संबधित अधिकार्‍यांच्या वेतन प्रणालीमध्ये बदल करावेत, असे आदेशात नमूद केले आहे. तसेच ज्या अधिकार्‍यांना वाहन उपलब्ध करून दिले असताना सुद्धा त्यांना वाहन पुरविले असल्यास वाहन पुरविल्याच्या दिनांकापासून त्यांच्याकडून वसुली करावी, असे आदेश दिले आहेत.