‘मिशन कवच कुंडल’ : पालिका घरोघरी जाऊन करणार लसीकरण ; शहरातील २० टक्के नागरिकांनी घेतला नाही पहिला डोस

पिंपरी - चिंचवड शहरात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु झाले. आजपर्यंत २० लाख ५३ हजार ३७३ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. जवळपास २० टक्के नागरिकांचा पहिला डोस राहीला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी महापालिका प्रशासन सजग आहे. तिसरी लाट येऊ नये व कोरोना हद्दपार व्हावा या दृष्टीने सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जास्तीत - जास्त लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरिक पुढे येत नाहीत.

    पिंपरी : पिंपरी – चिंचवड शहरातील २० टक्के नागरिकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला नाही. महापालिकेला लशींची उपलब्धता वाढली आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी आणि लसीकरण पूर्ण होण्यासाठी महापालिकेने आजपासून घरोघरी जाऊन लसीकरण सुरु केले आहे. लसीबाबत कोणताही गैरसमज मनात न ठेवता शहरातील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले. सर्वांचे लसीकरण झाल्यास कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता खूप कमी असल्याचेही त्यांनी सांगितले.

    पिंपरी – चिंचवड शहरात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु झाले. आजपर्यंत २० लाख ५३ हजार ३७३ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. जवळपास २० टक्के नागरिकांचा पहिला डोस राहीला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी महापालिका प्रशासन सजग आहे. तिसरी लाट येऊ नये व कोरोना हद्दपार व्हावा या दृष्टीने सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जास्तीत – जास्त लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरिक पुढे येत नाहीत. लसीची उललब्धता मुबलक प्रमाणात आहे. पण, नागरिक लसीकरणाला येताना दिसत नाहीत. मागील चार ते पाच दिवसांपासून दिवसभरात केवळ ८ ते ९ हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. त्यासाठी महापालिकेने आता गृहनिर्माण संस्था, घरोघरी, चाळ आदी ठिकाणी जाऊन लसीकरण सुरु केले आहे.

    डॉ.लक्ष्मण गोफणे म्हणाले, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियोजन करुन घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लसीकरण केंद्रांच्या वेळेमध्ये देखील वाढ केली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत लसीकरण केंद्र सुरु असतात.जगभरात कोरोनाची साथ कमी झाली. त्याचे कारण केवळ लसीकरण आहे. पिंपरी – चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे. शहरातील २० टक्के नागरिकांनी पहिलाही डोस घेतलेला नाही. या नागरिकांनी त्वरित पहिला डोस घ्यावा. ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांनी दुसराही डोस घ्यावा. कोविड लसीच्या उपलब्धतेची परिस्थिती आता बदलली आहे. पूर्वीसारखा लसींचा तुटवडा नाही. आजमितीला महापालिकेकडे अडीच लाख लसीचे डोस आहेत. आणखी डोस मिळणार आहेत. नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी लस घ्यावी. राज्य सरकारच्या ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेला प्रतिसाद द्यावा. सर्वांचे लसीकरण झाल्यास कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता धुसर होईल.