बस स्टॉपवर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून हत्या

    पुणे : पुणे स्टेशनवरून मुंबईला निघालेला प्रवासी काही काळासाठी बस स्टॉपवर झोपला असताना त्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळखळ उडाली असून, या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय बाबू कदम (वय ३५ रा. मूळचा घाटकोपर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय कदम हे शिरुर येथील एका हॉटेलमध्ये कामाला होते. ते घाटकोपर येथे काल रात्री जाण्यास निघाले होते. काही वेळ आराम करण्याच्या दृष्टीने ते साधू वासवानी चौकातील एका बस स्टॉपवर झोपले होते. त्यावेळी संजय यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्या परिसरातून जाणार्‍या नागरिकांनी एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच, आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर, तात्काळ रूग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

    मृत संजय यांच्या जवळील कागदपत्रावरून ते घाटकोपर येथील असल्याचे स्पष्ट झाले असून, संजय यांचा खून कोणत्या कारणावरून झाला असावा, हे अद्यापपर्यंत समजू शकले नाही. चोरीच्या उद्देशाने खून झाला असण्याची शक्यता आहे. तसेच या परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यामातून आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले.