जुन्या वादातून भरदिवसा पाठलाग करुन एकाचा खून

मयत कानिफनाथ हे मंडप व्यावसायिक आहेत. ते कामानिमित्त रविवारी सकाळी चिखली परिसरात आले होते. त्यावेळी साने चौकाजवळ आल्यानंतर मारेकर-यांनी कानिफनाथ यांचा धावत पाठलाग केला. साने कॉलनी रोडवर आल्यानंतर मारेकऱ्याने कानिफनाथ यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांचा जीव जात नसल्याचे पाहून आरोपींनी कानिफनाथ यांच्या डोक्यात दगड मारून निर्घृणपणे खून केला.

    पिंपरी : जागेच्या वादातून झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून चिखलीतील साने कॉलनी रस्त्यावर एका व्यक्तीचा पाठलाग करून भर दिवसा दाट लोकवस्तीच्या ठिकाणी हत्याराने वार करून तसेच दगडाने ठेचून खून केल्याची घटना रविवारी (दि. ११) दुपारी दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हा खून अतिक्रमण केलेल्या जागेच्या वादातून झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून केला असल्याचे सांगितले आहे.

    कानिफनाथ लक्ष्मण क्षीरसागर (वय ३८, रा. परशुराम चौक, विद्यानगर, चिंचवड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आकाश उर्फ मकसूद विजय जाधव (रा. रामनगर, चिंचवड), शिवराज अविनाश ननावरे (रा. रुपीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कानिफनाथ हे मंडप व्यावसायिक आहेत. ते कामानिमित्त रविवारी सकाळी चिखली परिसरात आले होते. त्यावेळी साने चौकाजवळ आल्यानंतर मारेकर-यांनी कानिफनाथ यांचा धावत पाठलाग केला. साने कॉलनी रोडवर आल्यानंतर मारेकऱ्याने कानिफनाथ यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांचा जीव जात नसल्याचे पाहून आरोपींनी कानिफनाथ यांच्या डोक्यात दगड मारून निर्घृणपणे खून केला.

    खुनाची घटना घडतात चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान बघ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात झाली. हा प्रकार साने चौकापासून सुमारे दोनशे मीटरच्या अंतरावर दाट लोकवस्तीच्या ठिकाणी घडला. भरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

    चिखली पोलिसांनी पथके तयार करून आरोपींच्या शोधत रवाना केली. त्यातील एका पथकाला माहिती मिळाली की, रक्ताने माखलेले धारदार हत्यार घेऊन दोघेजण यादवनगर येथे एका पत्र्याच्या शेड मध्ये बसले आहेत. त्यांच्या कपड्यांवर देखील रक्ताचे डाग आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून घटना घडल्यानंतर दोन तासात आरोपींना ताब्यात घेतले.

    आरोपींचा आणि मयत कानिफनाथ यांचा जुना वाद होता. तसेच साने कॉलनी येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या तत्कालीन वादातून आरोपींनी त्यांचा पाठलाग करून खून केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.