‘तू आम्हाला मारणार होतास ना…’ असे म्हणत तरूणाचा खून; पाच आरोपी अटकेत

    पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून तरूणाचा कोयत्याने वार करून खून केला. ही घटना थेरगाव येथे घडली. वाकड पोलीसांनी एका तासात गुन्ह्याची उकल करून पाच आरोपींना गजाआड केले. तर, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

    पंकज अभिमन्यू धोत्रे (वय २२, रा. दत्तवाडी, नेरे, ता. मुळशी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुख्य सूत्रधार चेतन दीपक वीटकर (वय २६), निलेश जितेंद्र फडतरे (वय २०), सुमित विजय हाराळे (वय १९), मंथन सुधाकर चव्हाण (वय १९), प्रथमेश बाळू शिंदे (वय १९, सर्व रा. थेरगाव) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. करण सुभेदार जैसवार (वय २२, रा. वाकड) याने फिर्याद दिली आहे.

    मृत पंकज हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. पंकज आणि आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. पंकज आपल्याला मारणार असल्याची आरोपींना कुणकुण लागली होती. त्यामुळे आरोपींनी त्याच्या खुनाचा कट रचला. आठवडाभरापासून आरोपी पंकजवर पाळत ठेवून होते. रविवारी (दि. ६) रात्री सव्वाआठच्या सुमारास पंकज थेरगाव येथील सोळा नंबर बसस्टॉपजवळ आला होता. त्यावेळी तेथे दबा धरून बसलेल्या आरोपींनी पंकजला घेरले.

    ‘तू आम्हाला मारणार होतास ना, आम्हीच तुला खल्लास करतो’, असे म्हणत पंकजवर कोयत्याने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पंकज याच्यावर तीन गुन्हे दाखल होते. वाकड पोलीस तपास करत आहेत.