मुरूम माफियांचा डोळा शासकीय जमिनींवर?

देऊळगाव गाडा येथील प्रकार

दौंड :  दौंड तालुक्यातील देऊळगाव-गाडा येथील शासकीय व खाजगी जागेतील डोंगर पोखरून बेकायदा गौण खनिजाचा बेसुमार उपसा होत असून स्थानिक महसूल कर्मचारी यांच्या संगम मताने लाखो ब्रास मुरूमाची चोरी केली जात असल्याचे आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.  गौण खनिज विभागामार्फत माती, मुरूम, दगड, वाळू यांच्या खरेदी- विक्रीवर आकारण्यात येणाऱ्या स्वामीशुल्क द्वारे या विभागाला लाखों रुपयांचा महसुल मिळतो. मात्र, देऊळगाव-गाडा येथे दिवसरात्र मुरुमाचे उत्खनन करत चोरट्या पद्धतीने बेसुमार मुरूम उपसा व वाहतूक चालु आहे. देऊळगाव-गाडा हद्दीत दिवसरात्र मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन चालू आहे, मात्र, स्थानिक महसूल कर्मचाऱ्याला हाताशी धरून देऊळगाव-गाडा मध्ये मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन जोमात असल्याची चर्चा परिसरात चालू आहे. देऊळगाव-गाडा येथे अनेक महिन्यापांसून मुरूम वाहतुकीसाठी मोठ्या वाहनांची वर्दळ होताना दिसत आहे.

-वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था बिकट

गौण खनिजांची अवैध वाहतूक करणाऱ्यांचा असा दिवसरात्र धुमाकुळ सुरू आहे. तालुक्यातील गौण खनिज व्यावसायिक आणि महसूल विभागाचे संबध जिव्हाळ्याचे असल्याचे दिसत असल्याने तालुक्यात कोणत्याही ठिकाणी उत्खनन करण्यासाठी या खात्याकडून कायम हिरवा कंदील दिला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

-मुरूम माफियांवर कारवाई होणार का?

देऊळगाव-गाडा येथील गाव कामगार मनीषा कदम यांना याबाबत विचारे असता खूप महत्त्वाचे काम असल्याने मुरूम उत्खनन संदर्भात नंतर पाहू असे उडवाउडवीचे उत्तर दिले. यामुळे स्थानिक महसूल कर्मचारीच मुरूम उत्खननला हिरवा कांदीर देत असल्याचे आरोप नागरिक करत आहेत. दरम्यान देऊळगाव-गाडा परिसरातील अवैध्य मुरूम वाहतुकीमुळे येथील रस्त्याची अवस्था बिकट झाली असून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना व विध्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मुरूम वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली असल्याची तक्रार संबंधित मुरूम माफियांना केली असता अरेरावीची भाषा ग्रामस्थांना करत आहे. तसेच दौंड महसूल खिशात घेऊन फिरतो असे मुरूम माफिया सर्वत्र सांगत आहे. यामुळे संबंधित मुरूम माफियांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महसूल विभागाच्या वरिष्ठांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन देऊळगाव-गाडा येथील गाव कामगार व संबंधितांची योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाईची मागणी केली असून रस्त्याची त्वरित दुरुस्तीची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.