महागड़ी ‘ऑडी’ कारची परस्पर विक्री

मूळ मालकाच्या नकळत परस्पर चौघांनी मिळून बनावट कागदपत्रे तयार करुन त्याआधारे विकली ऑडीकार

पिंपरी: महागड़ी ऑडी कारच्या मूळ मालकाच्या नकळत परस्पर चौघांनी मिळून बनावट कागदपत्रे तयार करुन त्याआधारे ती कार विकली. कार खरेदी करणारे आणि मूळ मालक यांनी याबाबत पोलिसात धाव घेतली. याबाबत चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेश सुरेश गावडे (वय ४२, रा. टाटा मोटर्स समोर, चिंचवड) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शाम शिंदे, रेणुका जैन, प्रशांत गायकवाड आणि एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना फिर्यादी यांच्या नावावर आयसीआयसीआय बँकेचे कर्ज काढून त्यांना ऑडी कार (एम एच १२ / आर आर ५५०५) घेऊन दिली होती. फिर्यादी यांच्या परस्पर आरोपींनी ती कार गहाण ठेवली. त्यानंतर आरोपी रेणुका, प्रशांत आणि अनोळखी व्यक्तीने मिळून फिर्यादी यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, बँकेचे लोन क्लिअरन्स सर्टिफिकेट बनवले.

आरटीओ फॉर्मवर फिर्यादी यांच्या सह्या करून फिर्यादी यांच्यासारखा दिसणारा व्यक्ती उभा करून तोच मालेश गावडे आहे, असे भासवून संजय लडकत नावाच्या व्यक्तीने ऑडी कार विक्री केली. याबाबत कार खरेदी करणारे संजय लडकत आणि फिर्यादी यांनी चर्चा करून यातील कागदपत्रांची खात्री करून पोलिसात धाव घेतली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.